सदर बझारमधील मुलींच्या अनधिकृत वसतिगृहासह जिल्ह्यातील भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमींची चौकशी करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी; आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 19 November 2026


सातारा : जिल्ह्यातील अनधिकृत आणि विनापरवाना भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमींचे तात्काळ सुरक्षा व वाणिज्यिक लेखापरीक्षण (ऑडिट) करून सर्व अकॅडमी चालकांची पोलिसांमार्फत सखोल चारित्र्य पडताळणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.
सातारा शहर, तालुका परिसर आणि फलटण तालुक्यात मागील काही वर्षांपासून सैन्य, पोलीस आणि निमलष्करी दलाच्या भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या नावाखाली शेकडो खासगी अकॅडमी सुरू झाल्या आहेत. अलीकडेच सातारा तालुक्यातील सोनवडी येथील श्रेया खामकर या युवतीने त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील अनेक अकॅडमी कोणतेही शासकीय नियम न पाळता मनमानी पद्धतीने चालवल्या जात असून, लष्कर आणि पोलीस दलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पालक व विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी फलटण तालुक्यातील काही अकॅडमी चालकांचा लष्कर भरती पेपरफुटीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग उघड झाला होता. तसेच, अकॅडमी चालकांमधील आपसातील वर्चस्ववादातून एकमेकांच्या वाहनात गावठी पिस्तूल आणि अमली पदार्थ लपवून अडकवण्याचे गंभीर प्रकारही समोर आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून खुलेआम प्रशिक्षण संस्था चालवल्या जात असल्याने तरुण पिढीचे भविष्य आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली असल्याची चिंता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने व्यक्त केली आहे.
अनेक अकॅडमी चालक आपल्या प्रशिक्षणार्थींना भल्या पहाटे शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि महामार्गावर कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय धावण्याचा सराव करायला लावतात. कोरेगाव तालुक्यातील देऊर येथे अशाच प्रकारे भरतीचा सराव करणाऱ्या चार युवकांचा कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महामार्गावरील सरावावर तात्काळ बंदी घालण्याची आवश्यकता निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.
दुसरीकडे, सातारा शहरातील सदर बझार परिसरात एका खासगी इमारतीचा कोणताही वाणिज्यिक परवाना नसताना तिथे क्षमतेपेक्षा जास्त संख्येने शेकडो प्रशिक्षणार्थी मुलींना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी शंभर मुलींमागे केवळ चार स्वच्छतागृहे असल्याने मुलींची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहाच्या तातडीच्या गरजेपोटी या मुलींना रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी वाहनचालकांकडे लिफ्ट मागण्याची अत्यंत असुरक्षित वेळ येत असल्याची गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जिल्ह्यातील सर्व भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी व त्यांच्या संलग्न वसतिगृहांचे सुरक्षा आणि वाणिज्यिक ऑडिट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विनापरवाना चालणाऱ्या अकॅडमी कायमस्वरूपी बंद करून संबंधित संचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि सदर बझार परिसरातील मुलींच्या वसतिगृहाची महिला व बालकल्याण विभाग व पोलिसांमार्फत तात्काळ तपासणी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास जिल्ह्यातील युवक-युवतींच्या सुरक्षिततेसाठी तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
या वेळी निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर घाटगे यांच्यासह शफिक शेख, तेजस जाधव, निखिल शिंदे, ऋषिकेश घोरपडे, श्रीजीत पाटील, किरण पाटील, विजय शिर्के, संस्कार ढेमरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा कारागृहात ‘दिवाळी पहाट’ संगीतमय मैफल उत्साहात संपन्न; सुरांच्या मेजवानीने बंदीवान मंत्रमुग्ध
पुढील बातमी
सदर बझारमधील मुलींच्या अनधिकृत वसतिगृहासह जिल्ह्यातील भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमींची चौकशी करा

संबंधित बातम्या