श्यामला पंडित, डॉ. संजय बोरुडे, समीर जोशी यांच्यासह सहा जणांना मानाचा गुंफण पुरस्कार जाहीर

पत्रकार अमर मोकाशी, आनंदा थोरात, सुनील माने यांचाही सन्मान; मसूर येथील साहित्य संमेलनात होणार वितरण

by Team Satara Today | published on : 17 November 2026


सातारा : गुंफण अकादमीच्या वतीने साहित्य, सहकार, पत्रकारिता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे यंदाचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक श्यामला पंडित, डॉ. संजय बोरुडे, कराड अर्बन बँकेचे चेअरमन समीर जोशी, पत्रकार अमर मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते आनंदा थोरात आणि कलावंत सुनील माने यांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे एक अग्रगण्य व्यासपीठ म्हणून गुंफण अकादमीचा मोठा लौकिक आहे. या अकादमीच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आगामी १२ आणि १३ डिसेंबर रोजी मसूर (ता. कराड, जि. सातारा) येथे २२ वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या समारोप समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती गुंफण अकादमीचे प्रमुख डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये दौंड तालुक्यातील पिंपळगाव (राहू) येथील प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका सौ. श्यामला पंडित यांना 'गुंफण साहित्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. श्यामला पंडित यांचे आजवर अनेक काव्यसंग्रह, चारोळी संग्रह, कथासंग्रह, लेखसंग्रह आणि आत्मकथन प्रकाशित झाले असून, त्यांनी 'शामलाक्षरी' या नव्या काव्यप्रकाराची यशस्वी निर्मिती केली आहे. तसेच, अहिल्यानगर येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय बोरुडे यांना 'गुंफण सद्भावना पुरस्कार' देऊन गौरवण्यात येणार आहे. डॉ. बोरुडे यांनी कथा, कविता, एकांकिका, बालसाहित्य, समीक्षा आणि अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अत्यंत मौलिक लेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणारे कराड अर्बन बँकेचे चेअरमन समीर जोशी यांना 'गुंफण सहकार भूषण पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातून पुढे येत पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या लेखणीने वेगळा ठसा उमटवणारे पत्रकार अमर मोकाशी यांना मानाचा 'शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार' प्रदान केला जाणार आहे. याशिवाय, महिला सक्षमीकरणासह विविध सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणारे कराड येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा थोरात यांना 'गुंफण सामाजिक पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्याचबरोबर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून साहित्य, सांस्कृतिक तसेच नाट्य क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे कोल्हापूर जिल्ह्यातील गुणी कलावंत सुनील माने यांना 'गुंफण सांस्कृतिक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे डॉ. चेणगे यांनी स्पष्ट केले आहे. या पुरस्कारांच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वन विभागाच्या 'कारणे दाखवा' नोटिशीला केराची टोपली; तारळी पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाचे काम अद्यापही सुरूच

संबंधित बातम्या