पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोळशी ते वाघोली या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामावरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने परिसरातील ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सोळशी ते वाघोली हा रस्ता पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन परिसरातील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र या रस्त्याचे काम चालू होऊन वर्ष होत आले आणि या रस्त्याचा प्रश्न उत्तर कोरेगावातील सोशल मीडियावर गाजू लागला आहे या रस्त्याच्या कामाचा प्रश्न यापूर्वीही चर्चेत आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, काम अर्ध्यावरच बंद पडल्याने आणि काही ठिकाणी रस्ता उखडलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाचे उद्घाटन झाल्यानंतर रस्त्याचे काम वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याची स्थिती पाहता काम अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्घाटनाचा गाजावाजा झाला, पण रस्ता पूर्ण होणार कधी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने काही ठिकाणी खडी उघडी पडली असून, वाहनचालकांना सावधगिरीने वाहने चालवावी लागत आहेत. दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे.
निवडणुकीआधी भूमिपूजन, अद्यापही सोळशी-वाघोली रस्ता अपूर्णच; परिसरातील ग्रामस्थांमधून नाराजी
by Team Satara Today | published on : 16 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा