सातारा : शहरातील रस्त्यांवर वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारा अपघातांचा धोका कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे. जुना आरटीओ चौक आणि मोळाचा ओढा या वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या परिसरांमध्ये वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांची सुरक्षितता आणि वाहतूक नियोजनाचा प्रश्नही ऐरणीवर येत आहे. जुना आरटीओ चौक परिसरात विविध मार्गांवरून येणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. तर मोळाचा ओढा परिसरातून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. अशा ठिकाणी वाहनांचा अनियंत्रित वेग आणि अपुरी प्रकाश व्यवस्था यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरबट यांच्यासह दोन्ही ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रवाह, वाहनांचा वेग आणि संभाव्य धोकादायक ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला.
वाहनचालकांना वेळीच सावध करण्यासाठी वेगमर्यादा दर्शविणारे फलक, दिशादर्शक सूचना, आवश्यक ठिकाणी गतीरोधक आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला. तसेच जुना आरटीओ चौक ते वाढे फाटा मार्गावरील मोठ्या प्रमाणातील रंबलर्सचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. रंबलर्सची संख्या आणि त्यांची उपयुक्तता तपासून अनावश्यक अडथळे कमी करण्याची भूमिका वाहतूक शाखेने मांडली.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर उपाययोजनांची धावपळ करण्यापेक्षा संभाव्य धोके वेळीच दूर करण्याचा वाहतूक पोलिसांचा हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, कागदोपत्री प्रस्तावापलीकडे जाऊन प्रत्यक्ष रस्त्यांवर सुरक्षिततेच्या उपाययोजना कधी दिसणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सातारा शहरातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखा सरसावली; दोन धोकादायक ठिकाणांचा घेतला आढावा
जुना आरटीओ चौक, मोळाचा ओढा येथे सुरक्षिततेच्या उपाययोजना प्रस्तावित; बांधकाम विभागाकडे सुधारणा करण्याची मागणी
by Team Satara Today | published on : 16 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा