सातारा : विकासाच्या नावाखाली तारळी खोऱ्यातील शेती, पाणी आणि पर्यावरणाचा बळी दिला जाणार असेल, तर असा विकास आम्हाला मान्य नाही. अदानी कंपनीचा तारळी पंप स्टोरेज प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी घेतला आहे. प्रकल्पाच्या खर्चाबाबत शंभरपट तफावत दाखविल्याचा आरोप करत त्यांनी कंपनीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाची प्रत्यक्ष किंमत ५ हजार ६७५ कोटी रुपये असताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश तेलगू यांनी वन विभागाकडे ही किंमत केवळ ५६.७५ कोटी रुपये असल्याचे कळविल्याचा दावा पाटणकर यांनी केला. राज्य शासनालाही अशाच स्वरूपाची माहिती दिल्याचा त्यांचा आरोप आहे. मानद वन्यजीव वॉर्डन रोहन भाटे (शहा) यांनी ही बाब उघडकीस आणल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याची प्रक्रिया दिल्ली सरकारच्या पातळीवर सुरू झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या चार टक्के निधी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला देणे अपेक्षित होते. ५ हजार ६७५ कोटींच्या खर्चानुसार ही रक्कम सुमारे २२७ कोटी रुपये होते. मात्र, प्रकल्पाच्या खर्चाबाबतच चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप झाल्याने वन्यजीव संवर्धनासाठी मिळणाऱ्या निधीचे काय होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतीच्या पाण्यावर औद्योगिक प्रकल्पाचे सावट
तारळी नदीच्या पाण्यावर स्थानिक शेतकऱ्यांचा हक्क असून, कंपनीच्या पाणी वापरामुळे नदीकाठच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. तारळी कालव्याच्या माध्यमातून कराड, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांतील शेतीला मिळणाऱ्या पाण्यावर परिणाम होऊ शकतो. उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे औद्योगिक प्रकल्पासाठी पाणी आणि शेतीसाठी पाणी, असा संघर्ष भविष्यात उभा राहणार असल्याचे पाटणकर यांनी म्हटले आहे.
प्रकल्पासाठी जमिनी विकण्याकरिता एजंटांमार्फत ग्रामस्थांवर दबाव आणला जात असल्याचेही त्यांनी आरोप केले. जमीन देण्यास नकार देणाऱ्या नागरिकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याने परिसरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि बॅटरी स्टोरेजसारखे पर्याय उपलब्ध असताना जंगल, वन्यजीव आणि स्थानिक जनजीवन धोक्यात घालणारे प्रकल्प कशासाठी, असा सवाल करत पाटणकर यांनी तारळी प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी केली. कंपनीवर केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही, तर प्रकल्पच बंद करून अदानी कंपनीला माघारी पाठवले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
तारळी खोऱ्याच्या अस्तित्वासाठी अदानी प्रकल्पाविरोधात एल्गार! डॉ. भारत पाटणकर आक्रमक; प्रकल्प रद्द करण्याची मागणी, आर्थिक तफावतीच्या आरोपाने खळबळ
by Team Satara Today | published on : 16 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा