नांदलापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी; पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना, जखमी बिबट्याला शोधण्याची मोहीम सुरू

by Team Satara Today | published on : 15 November 2026


मलकापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याने उसाच्या फडाचा आधार घेतला. पुणे-बंगळुरू महामार्गावर नांदलापूर गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेची माहिती समजतात वनविभाग घटनास्थळी दाखल झाले. विविध मार्गाने शोध घेतला असता उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे जखमी बिबट्याला शोधण्याची मोहीम सुरूच आहे.
घटनास्थळावरून व वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावर शुक्रवारी रात्री नांदलापूर गावच्या हद्दीत पाचवड फाटा येथे मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर महामार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसली. या बिबट्याला जोरदार धडक बसल्याने त्याच्या मागील दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. थोड्याच वेळात बिबट्या महामार्गावरून हॉटेल शेजारी असलेल्या उसाच्या फडात मागील पाय ओढतच निघून गेला.
ही घटना येथील कर्मचाऱ्यांसह वाहनधारकांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बिबट्याचा तपास घेण्यास सुरुवात केली. या परिसरात उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे बिबट्याला नेमके कोणत्या पद्धतीने शोधायचे? हा वन विभागापुढे एक प्रश्न होता.
कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी विशेष ड्रोन कॅमेऱ्यांचा आधार घेत पहाटे पाच वाजेपर्यंत शोध घेतला. मात्र बिबट्या सापडला नाही. पुन्हा शनिवारी सकाळपासून वन विभागाच्या वतीने जखमी बिबट्याची शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिवसाच्या शोध मोहिमेसाठी उसाच्या क्षेत्राला ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असून, हालचालीच्या ठिकाणी पिंजराही लावण्यात आला आहे. अशा पद्धतीने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी जखमी बिबट्याचा शोध घेत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊसदर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केल्याने शेतकरी संघटना आक्रमक; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात ऊस वाहतूक रोखली
पुढील बातमी
कराडमध्ये बँक मॅनेजरने संपविले जीवन; दोन महिला क्षेत्रीय व उपक्षेत्रीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या