मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाला भेटणार : ना. रामदास आठवले

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे; मतदानासाठी आधारकार्ड ग्राह्य धरण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 15 November 2026


सातारा : मतदार यादीतून काही मतदारांची नावे वगळली गेल्याच्या मुद्द्यावर देशभर आंदोलने सुरू आहेत. मात्र, कोणाचाही मतदानाचा अधिकार जाणीवपूर्वक काढून घेण्यात आलेला नाही. स्थलांतरित, मृत आणि अनेक वर्षे मतदान न केलेल्या मतदारांच्या नावांबाबत निवडणूक आयोगाने कार्यवाही केली आहे. तरीही प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी आपण निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच मतदानासाठी आधारकार्ड ग्राह्य धरण्याबाबतही आयोगाने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार निवडणूक आयोगाला अधिकार आहेत. मतदार यादी अचूक असणे आवश्यक आहे. राहुल गांधी यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र आंदोलन करून सरकार बदलता येत नाही. सरकार बदलायचे असेल तर २०२९ च्या निवडणुकीत जनतेसमोर जाऊन बहुमत मिळवावे लागेल. २०२४ मध्ये अपेक्षित ४०० जागा मिळाल्या नाहीत म्हणून आम्ही मतचोरीचे आरोप केले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
संविधान बदलणार आणि आरक्षण संपणार, असा विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, मोदी सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारे असून, ईडब्ल्यूएसचे १० टक्के आरक्षणही त्याचे उदाहरण आहे. राहुल गांधी यांचे फोन टॅप होत असल्याचा आरोपही चुकीचा आहे. त्यांना काही मुद्दे मांडायचे असतील तर त्यांनी संसदेत चर्चा करावी, असे आठवले म्हणाले.
सत्ता मिळवण्याचे भाजपचे तंत्र प्रभावी                                                                                            सातारा जिल्हा परिषदेत भाजपने महायुतीतील घटक पक्षांना बाजूला ठेवून सत्ता मिळवल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, सत्ता मिळवण्याचे भाजपचे तंत्र प्रभावी आहे. आज देशातील अनेक राज्यांत भाजपची सत्ता असून पक्ष संघटनात्मकदृष्ट्या सक्रिय आहे. राज ठाकरे यांनी एनडीए सरकार पडण्याचे केलेले भाकीतही निराधार आहे. विरोधकांनी २०२९ मध्ये एकत्र येऊन प्रयत्न करावेत, आम्ही त्यासाठी सज्ज आहोत, असा टोला त्यांनी लगावला.
विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणेही आवश्यक                                                                     पाटण तालुक्यात अदानी समूहाच्या प्रकल्पासाठी वृक्षतोड होत असल्याबाबत विचारले असता, जितकी झाडे तोडली जातील त्याच्या दुप्पट झाडे लावली पाहिजेत. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणेही आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागा वाढविण्याच्या आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेचेही त्यांनी समर्थन केले.
दरम्यान, आपला पक्ष कोणालाही गिळंकृत करत नाही. आपण भाजपमध्ये नसलो तरी भाजपसोबत आहोत आणि भाजपही आपल्या सोबत आहे, असे सांगत आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैबेरियाहून आफ्रिकेला जाणारा 'अमूर फाल्कन' पहिल्यांदाच आढळला फलटणमध्ये
पुढील बातमी
एपीके लिंक पाठवून 95 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा

संबंधित बातम्या