आनेवाडी : जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आनेवाडी गावच्या कन्या सोनिया संजय फरांदे यांनी आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी यश संपादन केले असून, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने त्यांची सहायक नगर रचनाकार, श्रेणी-१ (गट-ब, राजपत्रित) या पदावर नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीने आनेवाडी गावासह जावळी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याबाबत शासनाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत नियुक्ती आदेश जारी केला आहे. सोनिया फरांदे यांची महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत त्यांची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर शासनाने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.
या यशाचे सर्वात भावनिक वैशिष्ट्य म्हणजे, सोनिया यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुलीने मोठे अधिकारी व्हावे, स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात वेगळी ओळख निर्माण करावी, हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते. सोनिया यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यामुळे फरांदे कुटुंबासाठी हा क्षण आनंदाचा आणि अभिमानाचा ठरला आहे.
एमपीएससी परीक्षेत बाजी मारत आनेवाडीच्या सोनियाची सहायक नगर रचनाकारपदी निवड; जावळी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा
by Team Satara Today | published on : 13 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा