सातारा : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात दिनांक ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६ तसेच दिनांक १५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
१३ नोव्हेंबर रोजी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, पीएम जनमन, न्यूक्लियस बजेट, महिला बचत गट व कृषी योजनांतील पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटप व मार्गदर्शन केले जाणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता करून दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतील.
मुख्य शासकीय जयंती सोहळा दिनांक १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा, तालुका व मंडळ स्तरावरील सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरा केला जाईल. याच दिवशी पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, समाजसेवक आणि आदिवासी मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी आधार दुरुस्ती, वनपट्टेधारक लाभ, शेतकरी नोंदणी व पीकविम्यासाठी विशेष सेवा शिबिरे आयोजित केली जातील.
१७ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी, सिकलसेल जनजागृती व माता-बाल पोषण मार्गदर्शन केले जाईल तर १८ नोव्हेंबर रोजी कौशल्य विकास, रोजगार, जात वैधता आणि आर्थिक साक्षरता मार्गदर्शनाने या सप्ताहाचा समारोप होईल.
सप्ताहादरम्यान आदिवासीबहुल भागात शोभायात्रा, लोककला व क्रीडा स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन
by Team Satara Today | published on : 13 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा