सातारा शहरातील राधिका रोडवर अतिक्रमणांचा विळखा; भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा अक्षरश: बोजवारा

by Team Satara Today | published on : 12 November 2026


सातारा : सातारा शहरातील शेतकरी भाजी मंडई ते राधिका रोड, मनाली हॉटेल, मार्केट यार्ड आणि खंडोबा मंदिर परिसरात भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. व्यवसायासाठी जागा उपलब्ध असतानाही मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने रस्त्याची निम्म्याहून अधिक जागा व्यापली जात आहे. परिणामी, दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असून नागरिकांसह रुग्णवाहिकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात दररोज शेकडो शेतकरी व भाजी विक्रेते व्यवसायासाठी येतात. नगरपरिषदेने विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही काही विक्रेते निर्धारित जागेचा वापर न करता थेट मुख्य रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी मांडत आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेकदा १५ ते २० मिनिटे वाहतूक ठप्प होत असल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या परिसरात मोठी रुग्णालये असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे असल्यास रुग्णवाहिकेलाही मार्ग काढणे जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे केवळ वाहतुकीचाच नव्हे, तर नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी माजी शिक्षण मंडळ सभापती रामभाऊ हादगे आणि पाणीपुरवठा समितीच्या सभापती सीता रामभाऊ हादगे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
नगरपरिषदेने प्रत्यक्ष पाहणी करून भाजी विक्रेत्यांना निर्धारित जागेतच व्यवसाय करण्याच्या सक्त सूचना द्याव्यात. रस्त्यापासून पाच फूट जागा सोडून पांढरी पट्टी मारावी आणि विक्रेत्यांसाठी हद्द निश्चित करावी. तसेच या परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस अथवा अतिक्रमण विभागाचा कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे, विभागप्रमुख सुमित नाईक,  ऋषिकेश साठे आदी उपस्थित होते


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सिद्धनाथ-जोगेश्वरी हळदी समारंभ उत्साहात; दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार
पुढील बातमी
शिक्षक बँक ते तहसीलदार कार्यालय रस्त्यावर एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या