सातारा : सण-उत्सव हे केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता समाजातील वंचित, निराधार आणि गरजू घटकांसोबत साजरे केले, तर त्यातून खऱ्या अर्थाने माणुसकीचे नाते अधिक घट्ट होते. याच भावनेतून सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी आपल्या आई-वडील, पत्नी, मुलगी, बहिणी, भाचे यांच्या समवेत देगाव (ता. सातारा) येथील माहेर आश्रमात भाऊबीज साजरी केली. त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले.
दिवाळीच्या सणात भाऊबीजेचे विशेष महत्त्व आहे. बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण माहेर आश्रमातील अनाथ मुले, निराधार महिला आणि गरजू व्यक्तींसोबत साजरा करून तांबे कुटुंबीयांनी आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत वाटून घेतले. समाजातील या घटकांनाही आपलेपणाची जाणीव व्हावी, त्यांच्याही आयुष्यात सणाचा आनंद फुलावा, या भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबविला.
देगाव येथील 'माहेर आश्रम' ही अनाथ मुले, निराधार महिला आणि वंचित घटकांना निवारा, शिक्षण, सुरक्षितता तसेच पुनर्वसनाचा आधार देणारी सेवाभावी संस्था आहे. संकटग्रस्तांना हक्काचे घर आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाते.
पोलिस अधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना सामाजिक जाणिवेचे भान जपत तांबे यांनी कुटुंबीयांसह आश्रमातील बांधवांमध्ये भाऊबीजेचा आनंद साजरा केला. त्यांच्या या कृतीमुळे सणाचा आनंद केवळ स्वत:पुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा संदेश कृतीतून दाखवला आहे.
'माहेर आश्रमा'तील निराधारांसोबत पोलिस निरीक्षक नीलेश तांबेंची भाऊबीज; उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन
by Team Satara Today | published on : 12 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा