महाबळेश्वर तालुक्यात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटन व्यवसायाला उभारी; पर्यटक मोठ्या संख्येने दाखल

by Team Satara Today | published on : 10 November 2026


पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटन व्यवसायाला उभारी मिळाली आहे. दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी गुजरात, मुंबई आणि पुणे येथून पर्यटक मोठ्या संख्येने पाचगणी-महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे पाचगणीत मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची वर्दळ पहायला मिळत आहे. या गर्दीमुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे अर्थकारण वाढले आहे.
महाबळेश्‍वरमधील वेण्‍णा लेक, विविध पॉईंटस्‌, क्षेत्र महाबळेश्‍वर मंदिर आणि बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. थंडीचा जोर वाढल्‍याने सायंकाळनंतर बोचरी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. तर पाचगणीतील प्रसिद्ध टेबल लँडवर पर्यटकांची गर्दी होत आहे. घोडेस्वारी, निसर्गरम्य परिसर आणि विस्तीर्ण पठाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कुटुंबीयांसह येथे दाखल होत आहेत. पारसी पॉईंट आणि सिडनी पॉईंटवरही पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी आणि कुटुंबीयांसोबत छायाचित्रे काढण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू आहे.
पर्यटकांने स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थेला बूस्‍ट मिळाला आहे. हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे आणि खासगी बंगलोमध्ये पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. अनेक पर्यटकांनी आधीच निवासाची व्यवस्था केली असून काही जण उपलब्धतेनुसार राहण्याची ठिकाणे शोधताना दिसत आहेत. रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांची दुकाने, स्ट्रॉबेरी उत्पादनांची विक्री करणारे व्यावसायिक, वाहनचालक तसेच पर्यटनस्थळांवरील छोट्या व्यावसायिकांनाही या गर्दीचा फायदा मिळत आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये यंदा पावसाअभावी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती, फळबागा आणि शेतीपूरक व्यवसायांवर त्याचा परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पर्यटन व्यवसायाला मिळालेली ही चालना स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शहापूर येथे बिबट्या मादीची बछड्याशी सुखरूप भेट

संबंधित बातम्या