किल्ले अजिंक्यतारा पायथ्याशी चारभिंती परिसरात फटाक्यामुळे डोंगराला लागला वणवा; वृक्षप्रेमी तरुणांनी स्वतःच पाणी आणून आग आटोक्‍यात आणली

by Team Satara Today | published on : 10 November 2026


सातारा : किल्ले अजिंक्यतारा पायथ्याशी असलेल्या चारभिंती परिसरातील डोंगराला रविवारी रात्री फटाक्यामुळे वणवा लागल्याची घटना घडली. रात्री दहाच्या सुमारास लागलेली आग लक्षात येताच परिसरात वृक्षारोपण करणाऱ्या तरुणांनी अग्निशमन दलाची वाट न पाहता स्वतःच पाणी आणून आग आटोक्‍यात आणली.
चारभिंती परिसरात दररोज सायंकाळनंतर शाहूनगरमधील नागरिक फिरण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी येतात. दिवाळीच्या चार दिवसांत, विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. या परिसरात विविध वृक्षप्रेमी संघटना आणि तरुणांच्या ग्रुपने वृक्षारोपण केले आहे. गाड्यांमधून पाणी आणून ही झाडे जगवण्याचे काम तरुणांकडून सातत्याने सुरू आहे. अशातच रविवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फटाका फोडल्याने डोंगराला आग लागली. घटनेची माहिती मिळताच वृक्षप्रेमी तरुणांनी तेलाचे डबे, प्लास्टिक कॅन आणि अन्य साहित्याच्या सहाय्याने पाणी आणून आग आटोक्‍यात आणण्‍यास सुरुवात केली. अंधारात खड्डे आणि दगडांची पर्वा न करता तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
एकीकडे मोठ्या मेहनतीने लावलेली झाडे जगवण्यासाठी तरुण धडपडत असताना दुसरीकडे फटाक्यांमुळे अशा घटना घडणे दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे. आपल्याला चांगले करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नका, अशी विनंती या वृक्षप्रेमी तरुणांनी शाहूनगरवासीयांसह चारभिंती परिसरात येणाऱ्या नागरिकांना केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राचार्य अण्णासाहेब होवाळे यांचे निधन
पुढील बातमी
रहिमतपूरमध्ये भंगार व्यावसायिकाच्या दुकानाला भीषण आग; साहित्य जळून मोठे नुकसान

संबंधित बातम्या