सातारा : देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावताना प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साताऱ्यात ‘एक दिवा सैनिकांसाठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता महासैनिक भवन, टीसीपीसी येथे हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त माजी सैनिक, वीर नारी तसेच वीरमाता आणि वीरपिता यांच्या सन्मानार्थ विशेष संगीत रजनी आयोजित करण्यात आली आहे. या सर्वांच्या समवेत दिवाळीचा आनंद साजरा करून सैनिकांच्या शौर्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाला अभिवादन करण्यात येणार आहे.
देशाच्या सीमेचे रक्षण करताना सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशसेवेचे व्रत जपत असतात. अनेक वीर जवानांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य, संयम आणि देशाप्रती असलेली निष्ठाही तितकीच प्रेरणादायी आहे. वीर नारी, वीरमाता-पिता आणि माजी सैनिकांप्रती समाजाने कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळीचा सण सैनिकांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सेना मेडल प्राप्त शंकर माळवदे यांनी केले आहे.
वीर जवानांच्या त्यागाला अभिवादन; महासैनिक भवनात मंगळवारी ‘एक दिवा सैनिकांसाठी’
माजी सैनिक, वीर नारी आणि वीरमाता-पित्यांसमवेत पालकमंत्री शंभूराज देसाई साजरी करणार दिवाळी; संगीत रजनीचे आयोजन
by Team Satara Today | published on : 09 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा