साताऱ्यात बाळूमामांच्या पालखीचे आगमन; जानकर कॉलनीत तीन दिवस मुक्काम, मेंढरांचा कळप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी!

by Team Satara Today | published on : 09 November 2026


सातारा : बाळूमामांच्या पालखीचे साताऱ्यात आगमन झाले असून जानकर कॉलनी येथे पालखीचा तीन दिवस मुक्काम आहे. बाळूमामांच्या मेंढरांचा भव्य कळप पाहण्यासाठी साताऱ्यासह परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर पालखीचे आगमन झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नगरसेवक अशोक शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज सकाळी ९ वाजता आरती व प्रसाद, तर रात्री ९ वाजता महारती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उद्या सकाळी ९ वाजता मेंढरांच्या लेंडी पूजनाचा भव्य सोहळा पार पडणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारकरांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रकाश भगवान कोकरे यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष बाळूमामांचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. आर्थिक किंवा अन्य अडचणींमुळे अनेक भाविकांना आदमापूर येथे जाणे शक्य होत नाही. अशा भाविकांना साताऱ्यातच दर्शनाची संधी उपलब्ध झाली आहे.
या आयोजनासाठी नियोजन समितीचे अशोक शेडगे, समाजसेवक समीर माने, सचिन जगताप तसेच नगरसेवक वसंत लिवे यांचे सहकार्य लाभल्याचे कोकरे यांनी सांगितले. बाळूमामांच्या मेंढरांच्या कळपात सुमारे सहा हजार मेंढरे असून त्यांच्या आगमनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. बाळूमामांच्या श्रद्धा आणि महात्म्याविषयी भाविकांमध्ये मोठी आस्था असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या धार्मिक सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाळूमामांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी नियोजन महत्त्वाचे - ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर; येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान
पुढील बातमी
वीर जवानांच्या त्यागाला अभिवादन; महासैनिक भवनात मंगळवारी ‘एक दिवा सैनिकांसाठी’

संबंधित बातम्या