भाजपला पर्याय देण्यासाठी जनतेसमोर नेतृत्वाचा चेहरा उभा करणे आवश्यक - पृथ्वीराज चव्हाण, इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे निर्णय घ्यायला हवा

by Team Satara Today | published on : 09 November 2026


मुंबई : देशात सध्या भाजपविरोधी वातावरण निर्माण होत असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मात्र, केवळ सत्ताधारी भाजपविरोधात नाराजी आहे म्हणून विरोधकांना सत्ता मिळेल, असे समजणे चुकीचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपला पर्याय देण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याबरोबरच जनतेसमोर नेतृत्वाचा चेहरा उभा करणे आवश्यक आहे. त्याबाबत इंडिया आघाडी एकत्रित निर्णय घेऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या सत्तेच्या प्रवासापासून ते आगामी निवडणुकांपर्यंतच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. "२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडेलचा मुद्दा प्रभावीपणे देशासमोर मांडला. त्यावेळी काँग्रेसविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप, अण्णा हजारे यांचे आंदोलन आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणामुळे एक विशिष्ट वातावरण तयार झाले होते. या वातावरणाचा फायदा भाजपला झाला आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना गुजरात मॉडेलच्या मुद्द्यावर थेट चर्चेचे आव्हान दिले होते. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या विकासाची तुलना करण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यावेळी मोदींना सांगितले होते. मात्र, त्यावेळच्या राजकीय प्रचारात गुजरात मॉडेलचा मुद्दा प्रभावी ठरला. मात्र, त्यानंतर भाजपने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे भाजपविषयीची लोकप्रियता २०१९ पासून कमी होऊ लागली", असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
"आगामी निवडणुकीत नेमका कोणाचा चेहरा पुढे करायचा, हा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे घ्यायला हवा. हा निर्णय आपण एकट्याने घेण्याचा विषय नाही. पण लोक अजूनही केवळ पक्षाचा जाहीरनामा किंवा विचारधारा पाहून मतदान करत नाहीत, तर नेतृत्वाचा चेहराही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे चेहरा देण्याचा प्रश्न टाळता येणार नाही", असे ठाम मत त्यांनी मांडले.
इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा की निवडणुकीनंतर नेतृत्वाचा निर्णय घ्यावा, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, व्यक्तीकेंद्रित राजकारणाच्या काळात नेतृत्वाचा चेहरा महत्त्वाचा ठरणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी एकटेच लढातायत का?
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सावध भूमिका घेतली. राहुल गांधी दिल्लीत आक्रमकपणे भाजपविरोधात लढताना दिसतात, मात्र महाराष्ट्रात काँग्रेसचा चेहरा कोण? असा प्रश्न पडतो. यावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, "राजकारणात केवळ विचार आणि तत्त्वज्ञान मांडून चालत नाही, तर जनतेला आकर्षित करण्यासाठी नेतृत्वाचा चेहरा असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाची सध्याची रचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेली आहे. त्यात बदल करायचे की नाही, याचा निर्णय राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षातील वरिष्ठ नेते घेतील"
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा पिछाडीवर गेल्याने पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज आहे का?, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर कोणाला सल्ला देण्याच्या भूमिकेत आपण नसल्याचे सांगत त्यांनी सावध उत्तर दिले. मात्र, निवडणूक जिंकायची असेल तर काही गोष्टी बदलण्याची आणि त्यावर पक्षांतर्गत चर्चा करण्याची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारूसाठी पैशाची वारंवार मागणी केल्याच्या कारणावरून पैशावरून वादातून कोरेगावात एकाच खून; संशयित आरोपीस अटक
पुढील बातमी
दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी नियोजन महत्त्वाचे - ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर; येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

संबंधित बातम्या