सातारा : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि शेतमजुरांनी घरून आणलेली चटणी-भाकर खाऊन शासनाचा निषेध नोंदवला.
राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दादा पाथर्डी यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे रामदास कांबळे म्हणाले की, शेतकरी रक्ताचे पाणी करून संपूर्ण जनतेसाठी धान्य पिकवतो. मात्र, आज त्याच बळीराजाच्या घरात अंधार असून सरकारकडून त्याला कोणताही ठोस दिलासा मिळत नाही. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या हाताला काम नाही. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. एमआयडीसीमधील रोजगारावरही परिणाम होत असल्याने बेरोजगारीचे संकट अधिक गंभीर बनले आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करावी, पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा तसेच बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर पक्षाच्या आदेशानुसार यापुढे अधिक तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडण्यात येतील, असा इशाराही रामदास कांबळे यांनी दिला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत वंचित बहुजन आघाडीची ‘काळी दिवाळी’; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध
by Team Satara Today | published on : 08 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा