ज्येष्ठ पत्रकार विकास धुळेकर यांचे निधन; संगम माहुली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

by Team Satara Today | published on : 08 November 2026


सातारा : गार्डन सिटी येथील रहिवासी, ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, नामवंत ग्रंथ वितरक व ज्येष्ठ मुद्रितशोधक विकास मोरेश्वर धुळेकर (वय ६७) यांचे रविवारी पहाटे उपचारादरम्यान आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता, मुद्रण आणि साहित्य वर्तुळावर मोठी शोककळा पसरली आहे.
​गेल्या आठवडाभरापासून विकास धुळेकर यांच्यावर सातारा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र रविवारी पहाटे रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गार्डन सिटी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. दुपारच्या सुमारास संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, भावजया आणि पुतणे असा मोठा परिवार आहे.
​विकास धुळेकर यांनी गेली जवळपास पस्तीस वर्षे 'दैनिक ऐक्य'मध्ये मुद्रितशोधक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली होती. मराठी भाषेवर आणि व्याकरणावर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. भाषेचा सखोल व्यासंग आणि अचूक मुद्रितशोधन यामुळे त्यांनी प्रकाशन क्षेत्रात स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला होता. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अनेक महत्त्वपूर्ण व वैचारिक ग्रंथांसह राज्यातील अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे मुद्रितशोधन त्यांनी अत्यंत बारकाईने केले होते. मुद्रितशोधनासोबतच 'ऐक्य'मधील त्यांचे 'विवेकसिंधू' आणि 'गुंजारव' ही सदरे वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली होती. या स्तंभांमधून त्यांनी विविध सामाजिक, वैचारिक आणि वाङ्मयीन विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन केले.
​केवळ पत्रकारिता आणि वृत्तपत्र व्यवसायापुरते मर्यादित न राहता, त्यांनी ग्रंथ संस्कृतीच्या प्रसारासाठीही मोठे योगदान दिले. सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य पुस्तक वितरकांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जात असे. विविध ग्रंथ प्रदर्शने, ग्रंथ दालने आणि साहित्य संमेलनांच्या माध्यमातून उत्तम पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्याचप्रमाणे 'गुंफण'च्या साहित्य चळवळीत ते कित्येक वर्षांपासून सातत्याने आणि हिरीरीने सक्रिय सहभागी होत असत. नवोदित लेखकांना मार्गदर्शन करणे, साहित्याची गोडी लावणे आणि विविध सांस्कृतिक चळवळींना पाठबळ देणे यात ते नेहमीच आघाडीवर असायचे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि वाचनसंस्कृतीवरील अथांग निष्ठा यामुळे त्यांचा साताऱ्यासह राज्यभरातील साहित्यिक व पत्रकार वर्तुळात मोठा गोतावळा निर्माण झाला होता.
​संगम माहुली येथे झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी दैनिक ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणिटकर, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, बाबुराव शिंदे, डॉ. बसवेश्वर चेणगे, सुरेश चिंचकर, लोकायत प्रकाशनाचे राकेश साळुंखे, सुधीर देशपांडे यांच्यासह साहित्य, पत्रकारिता, मुद्रणालय, प्रकाशन आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा तिढा : स्थानिक पातळीवर तोडगा काढावा, शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना सल्ला

संबंधित बातम्या