सातारा : सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पुराव्याशिवाय आरोप करून कोणाचीही प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा आक्रमक इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले यांनी दिला. यूट्यूबवरील लय भारी’ चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात भोसले यांनी 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून, न्यायालयाने त्यांच्या बाजूने तात्पुरता मनाई आदेश दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला ऍड. कमलेश पिसाळ, ऍड. इरा भोसले, जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे, अजित साळुंखे आदी उपस्थित होते.
तुषार खरात यांनी 24 ऑक्टोबर 2026 रोजी आपल्या यूट्यूब चॅनेलवरून भोसले यांच्याबाबत तसेच तारळे धरण परिसरातील अदानी समूहाच्या वीज निर्मिती प्रकल्पाशी संबंध जोडणारे व्हिडिओ प्रसारित केले होते. या व्हिडिओंमध्ये वाल्मिक कराड यांच्याशी तुलना करणे, रस्ता रुंदीकरणासाठी शेतकर्यांच्या जमिनींचा वापर, बेकायदेशीर कामकाज आणि गुंडगिरीसारखे आरोप करून आपली सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा भोसले यांनी केला.
पत्रकारितेच्या मूलभूत नियमांनुसार कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आणि संबंधितांची बाजू जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र, आपली बाजू न ऐकता एकतर्फी आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी कायदेशीर सल्लागार ऍड. कमलेश पिसाळ यांच्यामार्फत संबंधित पत्रकार, त्यांची कंपनी तसेच गुगलला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सातारा येथील दिवाणी न्यायालयात विशेष दिवाणी दावा क्रमांक 231/2026 दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या दाव्यासोबत दाखल केलेला तात्पुरत्या मनाई आदेशाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, तुषार खरात आणि लय भारी न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना भोसले यांच्याविरोधात बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित न करण्याबाबत तात्पुरती ताकीद दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 16 नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याची संधी संबंधितांना देण्यात आली आहे.
बदनामीचे प्रयोग खपवून घेणार नाही!
परळी भागातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविणे आणि विकासासाठी आमचे कुटुंब अनेक दशकांपासून कार्यरत आहे. निवडणुकीतून पराभूत करता येत नसल्याने अफवा आणि बदनामीचा मार्ग अवलंबला जात आहे. मात्र, अशा प्रकारांना मी भीक घालणार नाही. यापुढे तुषार खरातच नव्हे, तर कोणीही पुराव्याशिवाय बदनामीकारक वक्तव्य केल्यास त्याच्याविरोधात अब्रुनुकसानीसह फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही भोसले यांनी दिला.
तुषार खरात यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा! न्यायालयाकडून तात्पुरता मनाई आदेश
पुराव्याशिवाय बदनामी केल्यास कोणालाही सोडणार नाही’; जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांचा इशारा
by Team Satara Today | published on : 07 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा