सातारा : आली दिवाळी, आनंद पर्वाला ...’ या उत्साहपूर्ण वातावरणात सातारा जिल्ह्यात दीपोत्सवाच्या आनंदपर्वाला पारंपरिक उत्साहात सुरुवात झाली आहे. घराघरांत स्वच्छता, सजावट आणि लक्ष्मीपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नवीन कपडे, सोने-चांदीचे दागिने, लक्ष्मीपूजनाचे साहित्य, केरसुणी, पायपुसणी, फुले आणि फटाक्यांच्या खरेदीने बाजारपेठांना झळाळी आली आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वत्र दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
दिवाळीच्या पारंपरिक प्रथांना यंदाही नागरिकांनी प्राधान्य दिले आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणार्या मूर्ती, चौरंग, पणत्या, आकाशकंदील, रांगोळीचे साहित्य, पूजेची भांडी आणि सजावटीच्या वस्तूंच्या दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. घरातील समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणार्या केरसुणी आणि पायपुसणीच्या खरेदीलाही विशेष महत्त्व दिले जात आहे. लक्ष्मीदेवतेचे पूजन पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी घराघरांत तयारी सुरू आहे.
सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सराफ कट्ट्यासह शहरातील सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. शुभमुहूर्तावर खरेदी करण्याच्या परंपरेमुळे हलके दागिने, नाणी आणि चांदीच्या वस्तूंना मागणी आहे. झेंडू, गुलछडी, कॅस्टर यांसह विविध फुलांच्या खरेदीसाठी फुलबाजारात गर्दी होत आहे. घरांची सजावट, तोरणे आणि पूजेसाठी फुलांची मागणी वाढली आहे. दुसरीकडे, फटाक्यांच्या दुकानांमध्ये लहान मुलांसह कुटुंबीयांची गर्दी असून विविध प्रकारच्या फटाक्यांची खरेदी सुरू आहे.
पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता दरम्यान, पुढील दोन दिवसांत नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांच्या निमित्ताने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार परिसरासह जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन जादा बसेसचे नियोजन केले आहे. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त गाड्या सोडण्याची तयारी करण्यात आली आहे.
वाहतूक नियोजन आणि बंदोबस्तावर भर सातारा शहरातही सणासुदीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक नियोजन आणि बंदोबस्तावर भर दिला आहे. बाजारपेठा, सराफ कट्टा, फटाक्यांची दुकाने आणि गर्दीच्या प्रमुख ठिकाणी पोलिसांची नजर राहणार आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
एकीकडे दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि खरेदीचा उत्साह, तर दुसरीकडे पर्यटन, प्रवास आणि कौटुंबिक भेटीगाठींची लगबग अशा वातावरणात सातारा जिल्हा दिवाळीच्या आनंदात न्हाऊन निघत आहे.
आली दिवाळी... आनंदाची उधळण ! सातारा जिल्ह्यात सणोत्सवाला पारंपरिक उत्साहात सुरुवात
खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या; पर्यटनस्थळांवर गर्दीचा अंदाज, एसटीचे जादा गाड्यांचे नियोजन, पोलिसांचा बंदोबस्त
by Team Satara Today | published on : 07 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा