सातारा : न्यायालयीन कामात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी फलटण येथील विधी सेवा समितीशी संबंधित लोकसेवक व एका वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. नितीन विलासराव भोईटे (वय ४५, व्यवसाय-पॅनेल विधिज्ञ, फलटण तालुका विधी सेवा समिती) आणि अजिम सलीम मेटकरी (वय ३४, व्यवसाय-वकील, रा. गोळीबार मैदान, फलटण) अशी संशयतांचे नावे आहेत.
तक्रारदारावर लोणंद (ता. खंडाळा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या फलटण येथील न्यायालयातील प्रकरणाच्या अनुषंगाने न्यायालयीन कामासाठी फलटण तालुका विधी समितीच्या वतीने भोईटे यांची वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तक्रारदाराला जामीन मिळवून देण्यात मदत करण्यासाठी न्यायालयातील लिपिक देशमुख यांना देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच भोईटे यांनी मागितली होती.
त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, २ नोव्हेंबरला तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा लावण्यात आला होता. यावेळी लाचेची रक्कम वकील मेटकरी यांच्याकडे देण्यास सांगितल्यानंतर ती स्वीकारताना मेटकरी यांना पकडण्यात आले.
त्यानंतर पथकाने भोईटे यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे, गणेश ताडे, अजित कर्णे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
न्यायालयीन कामात मदत करण्यासाठी ४ हजाराची लाच घेताना फलटणमध्ये वकिलासह दोघे जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
by Team Satara Today | published on : 07 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा