मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तोच जिल्हा बँकेचा चेअरमन : ना. जयकुमार गोरे, चेअरमन निवडताना महायुतीतील सर्व घटक पक्षांना विश्‍वासात घेतले जाईल

by Team Satara Today | published on : 07 November 2026


सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. मात्र, असे असले तरी आता चेअरमनपदाच्या निवडीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेचा पुढील चेअरमन कोण होणार, याचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. मुख्यमंत्री सांगतील तोच जिल्हा बँकेचा चेअरमन होईल, असे वक्‍तव्‍य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना ना. गोरे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित बैठका घेऊन जागावाटप केले आणि महायुती म्हणून निवडणूक लढवली. स्थानिक पातळीवर चर्चा करून वरिष्ठांकडे आपली भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे आता चेअरमन निवडीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील. त्यांच्या आदेशानुसारच पुढील प्रक्रिया होईल. चेअरमन निवडताना महायुतीतील सर्व घटक पक्षांना विश्‍वासात घेतले जाईल, असेही ना. गोरे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेचा विषय न राहता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक नऊ जागा जिंकत मोठा भाऊ होण्याचा मान मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ८, तर शिवसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे चेअरमनपदावर भाजपचा दावा अधिक मजबूत मानला जात असला, तरी महायुतीतील इतर घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा बँकेत सर्वाधिक जागा जिंकून भाजपने आपले पारडे जड केले असले, तरी चेअरमनपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्थानिक नेत्यांच्या राजकीय आकांक्षांपेक्षा मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतिम ठरणार असल्याने आता ना. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवार यांच्‍याशी कशा पध्‍दतीने चर्चा करुन निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला तक्रारदाराशी लगट करणाऱ्या पुसेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचे निलंबन; पोलिस अधीक्षकांचा दणका
पुढील बातमी
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीला आता ९ नव्या गाड्या दाखल; कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार

संबंधित बातम्या