विद्यार्थी दिनानिमित्त साताऱ्यात बार्टीच्यावतीने शनिवारी विविध कार्यक्रम; व्याख्यान, पुस्तक विक्री, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव, गीतांतून प्रबोधन

by Team Satara Today | published on : 06 November 2026


सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्रांतीच्या विचारांचा जागर आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने बार्टी, पुणे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या वतीने विद्यार्थी दिन व शाळा प्रवेश दिनानिमित्त शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सातारा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या दिवसभर साताऱ्यात शैक्षणिक, वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचा प्रसार करण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. डी. टी. गायकवाड यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बाबासाहेबांचा संघर्षमय जीवनप्रवास, शिक्षणासाठी केलेले अथक प्रयत्न, सामाजिक परिवर्तनाची चळवळ आणि संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच प्रसिद्ध शाहीर राजेंद्र कांबळे यांचा 'गीत गायनातून प्रबोधन' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शाहिरी गीतांच्या माध्यमातून सामाजिक समता, शिक्षण, बंधुता, संविधानिक मूल्ये आणि महापुरुषांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शाळेत प्रवेश घेतला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ विद्यार्थी दिन साजरा केला जातो. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा बाबासाहेबांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्या अंतर्गत बार्टीच्यावतीने सवलतीच्या दरात पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येणार आहे
विद्यार्थ्यांचा सन्मान, पुस्तकांची विक्री विचारांचे प्रबोधन आणि शाहिरी कलेतून सामाजिक जागृती अशा विविध उपक्रमांनी हा विद्यार्थी दिन सोहळा हा प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बा बार्टीच्या महासंचालक दीपा -मुधोळ मुंडे व निबंधक डॉ. सुचिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार असून, विद्यार्थी, शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विस्तार व सेवा विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी बार्टीच्या वतीने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील
पुढील बातमी
दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या