सातारा : सण-उत्सवांचा आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा निर्माण करणारा असतो. मात्र, समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत हा आनंद पोहोचविणे हीच खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी आहे. याच भावनेतून सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. पोलिसांच्या या माणुसकीच्या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांची दिवाळी अधिक आनंददायी झाली.
शिवतेज हॉल येथे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात सुमारे 15 ते 20 दिव्यांग बंधू-भगिनींना मिठाई व भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस प्रशासनाच्या या आपुलकीच्या उपक्रमामुळे उपस्थित दिव्यांगांच्या चेहर्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल निकम यांनी केले. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह सातारा तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दिव्यांग बांधवांना वेळोवेळी सहकार्य आणि मदतीचा हात देत असल्याचे सांगून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करताना प्रशांत बगले म्हणाले की, आतापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी व कर्मचार्यांनी संस्थेला आणि दिव्यांग बांधवांना वेळोवेळी सहकार्य केले आहे. त्यांच्या या मदतीबद्दल आम्ही कायम ऋणी राहू. भविष्यातही असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक घटकाला सणांचा आनंद घेता यावा, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, चंद्रहार पाटील, उपनिरीक्षक अभिजित गुरव, हवालदार धनंजय कुंभार, मनोज गायकवाड, महेंद्र नारनवर, संतोष शेलार, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव आदी उपस्थित होते.
सणांचा खरा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो इतरांच्या आयुष्यातही फुलविण्यात असतो. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविणार्या सातारा तालुका पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सातारा तालुका पोलिसांच्या मायेच्या स्पर्शाने दिव्यांगांची दिवाळी झाली गोड! दिव्यांग बांधवांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप
by Team Satara Today | published on : 06 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा