सातारा : मराठी साहित्य विश्वात आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या गुंफण दिवाळी अंकाचे प्रकाशन सातारा येथे ज्येष्ठ पत्रकार जयवंत गुजर, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, प्रा. श्रीधर साळुंखे, डॉ. रवींद्र भारती, संपादक डॉ. बसवेश्वर चेणगे यांच्या हस्ते करण्यात आले.
अश्वमेध ग्रंथालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुंफणचा हा ३२ वा दिवाळी अंक आहे. रंजन आणि प्रबोधन या दोन्हीचा उत्तम संगम या अंकामध्ये साहित्याच्या रूपाने वाचकांपर्यंत पोहोचतो. वाचन संस्कृती कूस बदलत असताना सुद्धा या दिवाळी अंकाने स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवले आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे असे उद्गार डॉ. राजेंद्र माने यांनी याप्रसंगी काढले.
कसदार साहित्य व दर्जेदार निर्मितीमूल्य या वैशिष्ट्यांसह गुंफणने महाराष्ट्र, गोवा व सीमा भागात लोकप्रियता मिळवली आहे. या सगळ्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. ग्रामीण भागातील आणि अनेक नवोदित लेखकांना या दिवाळी अंकाने मंच मिळवून दिला आहे याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल असे जयवंत गुजर म्हणाले.
जिल्ह्यातील साहित्य चळवळ जिवंत ठेवण्याचा वसा चेणगे बंधूंनी गेली बत्तीस वर्षे निष्ठेने सांभाळला आहे. याकडे व्यवसाय म्हणून न पाहता गुंफणने ग्रामीण भागातील प्रतिभेला प्रकटीकरणाचे स्थान निर्माण करून दिले आहे अशा शब्दात प्रा. श्रीधर साळुंखे यांनी प्रशंसा केली. डॉ. रवींद्र भारती यांनी शुभेच्छा देताना अश्रमेध ग्रंथालयाला या प्रकाशनाची संधी मिळाली याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी गुंफण परिवाराच्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीचा मागोवा घेतला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गजानन चेणगे, मेधा गुजर, केशव चव्हाण, उद्धव बाबर यांच्यासह साहित्य प्रेमी उपस्थित होते.
गुंफण दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
by Team Satara Today | published on : 06 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा