फलटणचे दोन वकील लाचलुचपतच्या जाळ्यात

by Team Satara Today | published on : 06 November 2026


सातारा : न्यायालयीन कामात मदत करण्यासाठी कोर्ट क्लार्कच्या नावावर चार हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी फलटण तालुका विधी सेवा समितीच्या पॅनलवरील विधीज्ञासह एका खासगी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि. ५) फलटण येथील जेएमएफसी न्यायालय परिसरात ही कारवाई करण्यात आली. नितीन विलासराव भोईटे (वय ४५, रा. लक्ष्मीनगर, फलटण) आणि अजीम सलीम मेटकरी (वय ३४, रा. गोळीबार मैदान, फलटण) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
यातील तक्रारदाराविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्याचे दोषारोपपत्र फलटण न्यायालयात दाखल झाले आहे. तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने फलटण तालुका विधी सेवा समितीमार्फत नितीन भोईटे यांची पॅनल विधीज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, तक्रारदाराच्या न्यायालयीन जामिनाच्या कामात मदत करण्यासाठी न्यायालयातील क्लार्क देशमुख यांच्यासाठी चार हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी भोईटे यांनी केल्याची तक्रार २ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी फलटण येथील जेएमएफसी व सत्र न्यायालय परिसरात पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी भोईटे यांनी कोर्ट क्लार्कसाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार गुरुवारी जेएमएफसी न्यायालय परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी भोईटे यांनी लाचेची रक्कम अजीम मेटकरी यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार मेटकरी यांनी पंचांसमक्ष चार हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर पॅनल विधीज्ञ नितीन भोईटे यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पिंपोडे बुद्रुक येथे आरोग्य विभागाचा छापा; दोन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल
पुढील बातमी
चक्काजाम आंदोलन अखेर मागे; राजू शेट्टींची घोषणा

संबंधित बातम्या