सातारा : दुचाकी चोरून त्यांची विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवणाऱ्या दोघा विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सातारा शहर पोलिसांनी छडा लावला. मोळाचा ओढा परिसरातून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या माहितीवरून तब्बल सात मोटारसायकली हस्तगत केल्या. या दुचाकींची एकूण किंमत ५ लाख २५ हजार रुपये असून, या कारवाईत वाहनचोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
गोडोलीतील पालवी चौकातून २९ ऑक्टोबर रोजी मोटारसायकल चोरीला गेल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला चोरट्यांचा माग काढण्याच्या सूचना दिल्या. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने सलग तीन दिवस त्यांच्यावर पाळत ठेवली. अखेर मोळाचा ओढा परिसरात दोघेही पोलिसांच्या हाती लागले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघेही विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे स्पष्ट झाले. पालकांच्या उपस्थितीत केलेल्या चौकशीत त्यांनी सातारा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चार, सातारा तालुक्यातून एक आणि कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून एक दुचाकी चोरल्याचे सांगितले. चोरीच्या गाड्या विक्री करण्यासाठी लपवून ठेवल्याची माहितीही त्यांनी दिली.
पोलिसांनी त्यांनी दाखविलेल्या ठिकाणांहून सहा चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या. याशिवाय चोरीसाठी वापरलेली आणखी एक मोटारसायकल जप्त केली. या सातही दुचाकींची किंमत ५ लाख २५ हजार रुपये आहे. एका मोटारसायकलचा चॅसिस आणि इंजिन क्रमांक खोडण्यात आल्याने त्या वाहनाच्या मूळ मालकीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे, , पो.हवा.निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, वैभव माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, यांनी केलेली आहे.
दरम्यान, दुचाकी चोरी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित पार्किंगचा वापर करावा, सीसीटीव्हीच्या निगराणीतील जागेला प्राधान्य द्यावे तसेच हँडल लॉकसोबत अतिरिक्त सुरक्षा लॉक वापरावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे
चोरलेल्या दुचाकींचा विक्रीपूर्वीच पोलिसांनी घेतला शोध; दोन अल्पवयीन ताब्यात, पाच गुन्ह्यांची उकल
मोळाचा ओढा परिसरातून दोघांना पकडले; ५.२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
by Team Satara Today | published on : 04 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा