महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर ! नागठाण्यात ३१ तासांपासून रास्ता रोको; १४० पोलिसांचा फौजफाटा तैनात

by Team Satara Today | published on : 04 November 2026


सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे परिसरात गेल्या ३१ तासांपासून सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय कमी करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. केवळ कार्यालयातून सूचना देण्याऐवजी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून त्यांनी वाहतूक नियोजनाची जबाबदारी सांभाळली.
आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असताना संभाव्य कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग, सेवा रस्ते आणि महत्त्वाच्या चौकांमधील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले. अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक यांसह प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सेवा रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन करताना वाहनचालकांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठीही विशेष खबरदारी घेण्यात आली.
या संपूर्ण व्यवस्थेसाठी सुमारे १४० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वाहतुकीची परिस्थिती, वाहनांच्या रांगा आणि प्रवाशांची सुरक्षितता यांचा आढावा घेत पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरून यंत्रणेला दिशा दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करणे, हे पोलिसांसमोरील दुहेरी आव्हान होते.
लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाच्या परिस्थितीत संयम राखत वाहतूक व्यवस्थापन करणे ही पोलिसांसाठी कसोटीची बाब असते. अशा वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून यंत्रणेचे नेतृत्व करणे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारे ठरते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः रस्त्यावर उपस्थित राहून केलेल्या नियंत्रणामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनाला वरिष्ठ पातळीवरून थेट दिशा मिळाली. कर्तव्याला प्राधान्य देत प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीची या निमित्ताने चर्चा होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊसाला प्रतिटन ४,५०० रुपयांसाठी स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा; माजी आमदार शशिकांत शिंदेंची आंदोलनस्थळी भेट
पुढील बातमी
चोरलेल्या दुचाकींचा विक्रीपूर्वीच पोलिसांनी घेतला शोध; दोन अल्पवयीन ताब्यात, पाच गुन्ह्यांची उकल

संबंधित बातम्या