जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; महायुतीचे १३, राष्ट्रवादीचे ८ संचालक; शंभूराज देसाईंची पराभवाची परतफेड, जयकुमार गोरेंची दणदणीत एन्ट्री

रामराजेंच्या बालेकिल्ल्यातही सत्तासमीकरणांना धक्का; सुनील माने यांच्या विजयाचा फैसला चिठ्ठीवर

by Team Satara Today | published on : 03 November 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला असून, जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणातील सत्तासमीकरणांना नवे वळण मिळाले आहे. २१ जागांच्या या निवडणुकीत भाजपने नऊ जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आठ, तर शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या महायुतीच्या घटक पक्षांचे मिळून १३ संचालक बँकेत पोहोचले आहेत. राष्ट्रवादीला आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, हा निकाल केवळ जागांचा आकडा नसून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची, राजकीय वर्चस्वाची आणि आगामी सत्तासंघर्षाची दिशा ठरवणारा ठरला आहे.
सातारा शहरातील जरंडेश्वर नाका येथील नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष केला. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
देसाईंनी पराभवाची परतफेड; पाटणमध्ये ४२ वर्षांनंतर देसाई गटाची बाजी
या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत पाटण तालुक्यात झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा १२ मतांनी पराभव केला. देसाई यांना ५८, तर पाटणकर यांना ४६ मते मिळाली. मागील निवडणुकीतील १४ मतांच्या पराभवाची परतफेड करत देसाईंनी जिल्हा बँकेतील आपले राजकीय वजन पुन्हा सिद्ध केले. तब्बल ४२ वर्षांनंतर देसाई गटाने या मतदारसंघात विजय मिळविल्याने पाटणच्या राजकारणात या निकालाचे विशेष महत्त्व आहे.
जयकुमार गोरेंची पुन्हा एन्ट्री; माणमध्ये विरोधकांना धक्का
माण तालुक्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना १४, तर शिवसेनेचे शेखर गोरे यांना सात मते मिळाली. या निकालाने माणमधील गोरे यांच्या राजकीय वर्चस्वावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. जिल्हा बँकेच्या राजकारणात त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे.
फलटणमध्ये नाईक निंबाळकर कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला
फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सोसायटी मतदारसंघातून विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला. या लढतीने फलटणमधील नाईक निंबाळकर कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आणला आहे.
चिठ्ठीने बदलला कौल; सुनील माने यांचे नशिबाने तारले
कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. एका मतपत्रिकेवर आक्षेप घेतल्यानंतर ती बाद करण्यात आली आणि दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ४४ मते मिळाली. अखेर ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये सुनील माने यांच्या बाजूने कौल लागल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
कराडमध्ये माजी मंत्री स्व. विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी १०० मते मिळवून धनाजी पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. सावली मतदारसंघात भाजपचे ज्ञानदेव रांजणे यांनी ३८ मते मिळवून राष्ट्रवादीच्या विठ्ठल गोळे यांचा पराभव केला. गोळे यांना आठ मते मिळाली. खंडाळ्यात राष्ट्रवादीचे अजय भोसले यांनी २८ मते मिळवत भाजपच्या संजीव गाढवे यांचा सात मतांनी पराभव केला.
महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीच्या रूपाली राजपुरे यांनी आठ मते मिळवून शिवसेनेच्या संजय मोरे यांचा चार मतांनी पराभव केला. औद्योगिक विणकर मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत जाधव यांनी १९ मते मिळवून विजय मिळवला. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक प्रल्हाद चव्हाण यांनी ६१८ मते मिळवली, तर भटक्या-विमुक्त जमाती मतदारसंघातून भाजपचे अर्जुन काळे यांनी ३४९ मते मिळवून अपक्ष सुनील वाघ (२८४ मते) यांचा पराभव केला.
भाजपचे वर्चस्व; मात्र सत्तेचा खरा संघर्ष आता सुरू!
पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. उर्वरित जागांवरील लढतींमध्ये भाजपने चार, राष्ट्रवादीने पाच आणि शिवसेनेने तीन विजय मिळवले. त्यामुळे भाजप नऊ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित आता महायुतीच्या एकजुटीवर अवलंबून राहणार आहे.
या निकालात जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, उदयसिंह उंडाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपापल्या मतदारसंघांतील ताकद दाखवून दिली. दुसरीकडे, राष्ट्रवादीने आठ जागा मिळवत आपले अस्तित्व आणि राजकीय ताकद कायम असल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे संख्याबळ १३ असले, तरी अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि महत्त्वाच्या समित्यांवरील नियंत्रण मिळवताना नेत्यांमधील अंतर्गत राजकीय समीकर निर्णायक ठरणार आहेत.
त्यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असला, तरी जिल्हा बँकेतील सत्तेचा खरा सामना आता सुरू होणार आहे. भाजपच्या मोठ्या पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेची साथ कितपत मिळते आणि राष्ट्रवादी विरोधात राहून किती प्रभावी भूमिका बजावते, यावरच आगामी काळातील जिल्हा बँकेच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागरिकांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन; ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सातारा नगरपरिषद सरसावली
पुढील बातमी
नांदगाव येथील कृष्णा नदी पात्रातील मोटार पंपाची केबल चोरी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या