सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणांगणात काही ठिकाणी महायुतीचा धर्म पाळला गेला, तर काही ठिकाणी मित्रपक्षांकडूनच अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. महायुतीतील काही घटकांकडून दगाफटका झाल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली असती, तर सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविला असता. एवढेच नव्हे, तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपने स्वबळावर विजय मिळविला असता, असा खळबळजनक दावा ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सातार्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीतील राजकीय गणितांवर भाष्य करत मित्रपक्षांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सातार्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नूतन संचालक अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, अरुण गोरे यांच्यासह विजयी उमेदवार, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. गोरे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेचा आदर करून जागावाटप करण्यात आले. ज्या जागा ज्या पक्षाच्या वाट्याला आल्या, त्या जागांवर संबंधित पक्षाच्या उमेदवारांना सहकार्य करून निवडणूक लढविण्यात आली. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. बेईमानी आमच्या रक्तात नाही. त्यामुळे महायुतीतील सहकारी पक्षांच्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही प्रामाणिकपणे आणि ठामपणे उभे राहिलो. मात्र, सर्वच ठिकाणी अशाच प्रकारचे सहकार्य मिळाले असे नाही. काही ठिकाणी अपेक्षित सहकार्य झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे असतानाही महायुतीच्या उमेदवारांनी चांगले मतदान घेत विजय संपादन केला.
महायुतीतील घटक पक्षांकडून विमुक्त आणि भटक्या समाजातील उमेदवार अर्जुन काळे यांच्या उमेदवारीबाबत दगाफटका करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही गोरेंनी केला. विविध तालुक्यांतील मतदानाचे आकडे मांडत त्यांनी या निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधले. माण तालुक्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 116 मते मिळाली, तर खटावमध्ये राष्ट्रवादीला 144 आणि भाजपला 112 मते मिळाली. पाटणमध्ये महायुतीच्या उमेदवाराला 104, तर अपक्ष उमेदवाराला 99 मते मिळाली. या आकडेवारीवरून काही ठिकाणी महायुतीतील मतांचे विभाजन झाल्याचे दिसून येते, असे त्यांनी सूचित केले.
फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चांगले मतदान मिळविले. मात्र, समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांचा अवघ्या पाच मतांनी निसटता पराभव झाला. कराडमध्ये काही घटकांनी महायुतीचा धर्म पाळला, तर काही ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदे यांनी अटीतटीची लढत दिली; मात्र त्यांनाही निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. विजयी उमेदवारांमधील मतांचे अंतरही अवघे 15 मतांचे होते. त्यामुळे महायुतीतील सर्व घटकांनी एकदिलाने काम केले असते, तर निकालाचे चित्र वेगळे असू शकले असते, असे गोरेंच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.
जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ राजकीय प्रतिष्ठेची लढाई नसून सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेच्या भवितव्याशी संबंधित आहे. त्यामुळे निवडणुकीतील राजकीय मतभेद आणि स्पर्धा निकालानंतर बाजूला ठेवणे आवश्यक आहे. बँकेचे कामकाज करताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवले पाहिजेत. संचालकांनी पक्षीय राजकारणापेक्षा बँकेच्या हिताला प्राधान्य द्यावे. बँकेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. ‘जो दे उसका हो भला... जो ना दे उसका भी भला...’ अशी आपली भूमिका असल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीतील नाराजीपेक्षा संस्थेच्या हिताला महत्त्व देणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, कोरेगावमधील चिठ्ठी प्रकरणावर विजयी सदस्याने केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही गोरेंनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या काळात विविध आरोप-प्रत्यारोप झाले असले, तरी निकालानंतर त्यावर पडदा टाकून बँकेच्या कामकाजाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे, सहकारी पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचे त्यांनी आभार मानले.
अर्जुन काळे यांच्या विजयाचे विशेष कौतुक करताना गोरे म्हणाले, काळे यांचे यापूर्वीपासूनच चांगले काम आणि सर्वांशी सहकार्याचे संबंध राहिले आहेत. विमुक्त आणि भटक्या समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या त्यांच्या उमेदवारीबाबत संपूर्ण महायुतीमध्ये काही ठिकाणी अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्याविरोधात वेगवेगळी आव्हाने उभी राहिली. अशा परिस्थितीतही त्यांनी एकाकी लढत देत विजय मिळविला. त्यांचा हा विजय महत्त्वाचा असून त्यांच्या कामाची आणि संघर्षाची दखल घेतली पाहिजे, अशा शब्दांत गोरेंनी काळे यांचे अभिनंदन केले.
काही नेत्यांनी जयकुमार गोरे यांना आयुष्यात जिल्हा बँकेत पाय ठेऊ देणार नाही, अशा वल्गना केल्या होत्या. याबाबत बोलताना गोरे म्हणाले, मी पाच वर्षे जिल्हा बँकेत पायही ठेवला नाही. बँकेत जाईन तर सन्मानानेच, याबाबत मी ठाम राहिलो. आता मात्र बँकेत जाणार आहे. तेही एकटा नाही, तर माझ्या सदस्यांना घेऊन जाणार आहे.
पुणे विभाग पदवीधर निवडणुकीप्रमाणेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही काही ठिकाणी घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करताना गोरे म्हणाले, या निवडणुकीतून भाजपला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. काही राजकीय वास्तव अनुभवातूनच समजते. महायुती म्हणून निवडणूक लढविताना मित्रपक्षांना सोबत घेण्याची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र, सर्वांकडून त्याच पद्धतीने प्रतिसाद मिळाला नाही. भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली असती, तर निकालाचे चित्र वेगळे असते. सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची क्षमता भाजपमध्ये होती. जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप स्वबळावर विजयी झाला असता. मला लढायला माहीत आहे, अशा शब्दांत त्यांनी आगामी राजकीय लढाईचे संकेत दिले.
मुख्यमंत्री ठरवतील तोच जिल्हा बँकेचा अध्यक्ष!
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असता ना. गोरे यांनी हा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या पातळीवर होणार असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातील जबाबदारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे होती. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील. त्यामुळे अध्यक्षपद कोणाला द्यायचे, याबाबत सध्या तर्कवितर्क करण्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडही महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयानुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले.
स्वबळावर लढलो असतो तर सर्वच्या सर्व जागा जिंकल्या असत्या; महायुतीतील दगाफटक्यावर जयकुमार गोरेंची नाराजी; अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
by Team Satara Today | published on : 03 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा