कोरेगाव : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाच्या सुनील माने आणि भारतीय जनता पक्षाच्या सुनील खत्री या दोन मित्रांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल अखेर "ईश्वर चिठ्ठी"वर लागला. श्री. माने विजयी झाले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची 2021 मध्ये झालेली संचालक मंडळाची निवडणुकीही अशीच चुरशीने झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यावेळी एकत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे, नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीराव महाडिक आणि शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सुनील खत्री यांच्यात चुरशीने झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्यक्षात व कागदावरही प्रबळ होती, तर प्रतिस्पर्धी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही प्रत्यक्षात व कागदावरही तुलनेत क्षीण होती.
त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी एकतर्फी जिंकेल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. प्रत्यक्ष निवडणूक झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांना समान 45 मते मिळाल्याचे पाहून सर्वाना एक आश्चर्याचा धक्का बसला होता. यातून एक स्पष्ट झाले होते की, राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठी फुट पडली होती. या निवडणुकीत अखेर ईश्वरी चिठ्ठीने श्री. खत्री यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली गेली. आता पाच वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत थोडेफार राजकीय स्थित्यंतरे झाली होती.मात्र मतांचे बलाबल 2021 सारखेच होते.
म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रबळ होती. फक्त श्री. महाडिक यांच्या जागी सुनील माने हे निवडणूक रिंगणात उतरलेले होते, तर समोरून पुन्हा एकदा सुनील खत्री भाजपच्या वतीने रिंगणात उतरून नशिब अजमावत होते. एकूण मतांचे बलाबल पहाता या निवडणुकीत श्री. माने हे सहज विजयी होतील असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत असताना दोन्हीही उमेदवारांना समान 44 मते मिळाली व हा निकाल पुन्हा एकदा ईश्वरी चिठ्ठीवर गेला. "राष्ट्रवादी"कडे अधिकची मते असताना त्यांची मते फुटल्याचे स्पष्ट झाल्याने हा निकाल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना आत्मचिंतन करायला लावणारा,तर भाजपला बळ देणारा ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत "ईश्वर चिठ्ठी"वर सुनील माने विजयी
निकाल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना आत्मचिंतन करायला तर भाजपला बळ देणारा ठरला
by Team Satara Today | published on : 03 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा