नागपूर : ‘या’ सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. महाराष्ट्र विकायला काढला आहे. अगदी झाडेझुडपे, पानाफुलांसकट महाराष्ट्राची विक्री सुरू आहे. माझ्या बोलण्याचा राग आला तरी चालेल; पण आता बोलण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते व पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी सोमवारी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सह्याद्रीतील जंगलतोडीच्या विरोधात त्यांनी नागपुरातून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली.
‘थाळी बजाव’ आंदोलन
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत प्रस्तावित पंप्ड स्टोरेज वीज प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडली जाणार आहेत. या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत असून, ‘सह्याद्री वाचवा, महाराष्ट्र वाचवा’ अभियानांतर्गत सोमवारी नागपुरात ‘थाळी बजाव’ आंदोलन करण्यात आले.
शहर विस्थापित करून प्रकल्प उभारा
तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी ‘पंप्ड स्टोरेज प्रकल्प’साठी आग्रही सरकारच्या भूमिकेवर प्रखरपणे हल्ला केला. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे विकासाच्या नावाखाली त्यांचे गड-किल्ले नष्ट करण्याचा कुटील डाव आखला जात असल्याची घणाघाती टीका शिंदे यांनी केली. विजेशिवाय माणसे जगू शकतात, पण ऑक्सिजनशिवाय नाही. विजेची गरज माणसांना आहे, झाडे आणि पशुपक्ष्यांना नाही. त्यामुळे सरकारने एखादे शहर विस्थापित करून प्रकल्प उभारावा, पण जंगलांना हात लावू नये, असा इशारा त्यांनी दिला.
सरकारने किती झाडे लावली? याचा हिशेब द्यावा
माणसे नसली तर झाडांना फरक पडत नाही, पण झाडे नसली तर माणसांना फरक पडतो. पर्यावरणाचा ऱ्हास करून साधलेला विकास खोटारडा आहे. झाडांच्या बदल्यात दुसरीकडे वृक्षलागवड करण्याचे सरकारचे आश्वासन म्हणजे नाटक आहे. कोटीच्या कोटी वृक्षलागवडीचा दावा करणाऱ्या सरकारने किती झाडे लावली आणि त्यातील किती जगली? याचा हिशेब द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले. १९४७ मध्ये देशात ७० टक्के जंगल होते, आता ते १८ ते २० टक्क्यांवर आल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
झाडांना वाचवण्यासाठीचा शेवटपर्यंत लढा
कोरोनानंतर सरकारला ‘झाडखाऊ’ नावाच्या विषाणूची लागण झाली आहे. हा विषाणू पळवून लावण्याची गरज आहे, अशी टीका करत त्यांनी आंदोलनाची व्याप्ती स्पष्ट केली. राज्यातील २८ हजार गावे आणि ४२४ हून अधिक लहान-मोठ्या शहरांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. लोकांनो, आरत्या करा, विनंती करा, थाळ्या वाजवा; पण झाडे तोडू देऊ नका. ऑक्सिजन कोणताही मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा करोडपती देत नाही. त्यामुळे घाबरू नका, आवाज उठवा, असे आवाहन शिंदे यांनी केले. झाडांना वाचवण्यासाठीचा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
चित्रपट कलावंतांना पुढे येण्याचे आवाहन
चित्रपट सृष्टीतील लोक संवेदनशील आहेत. त्यांच्याही मनात महाराष्ट्रातील घडामोडींविषयी राग असेल. मी अभिनेते, लेखक, कवी, निर्माते यांना आवाहन करतो की, त्यांनीही घराबाहेर पडून झाडे तोडल्या जात आहे, त्या ठिकाणी जावे, विरोध दर्शवावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारने झाडाझुडपासकट महाराष्ट्र विकायला काढला; ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांची सरकारवर टीका; नागपुरातून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
by Team Satara Today | published on : 02 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा