शिरवळ : येथील कोल्हाटी वस्तीतील २३ वर्षीय युवकाला विनाकारण शिवीगाळ करीत सराईत गुन्हेगारांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पितांबर मोतीराम कुडाळकर हा जखमी झाला. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही संशयितांनी धारदार शस्ञांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत सहा जणांना जखमी केले.
याप्रकरणी सराईत गुन्हेगार आतिष उर्फ बाबू राजेंद्र कांबळे याच्यासह पाच जणांविरोधात शिरवळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यात तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना काल, रविवारी (दि.१) रोजी रात्री घडली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अनिकेत कांबळे, सराईत गुन्हेगार आतिश उर्फ बाबू राजेंद्र कांबळे (वय २३), विशाल शेखर वाडेकर (२५), रामा दादा मंडलिक(२३), ओंकार राजेंद्र कांबळे (२५, सर्व रा. शिरवळ ता. खंडाळा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पितांबर मोतीराम कुडाळकर हा कोल्हाटी वस्ती येथील घरी जात असताना एका मंदिराजवळ अनिकेत राजेंद्र कांबळे हा विनाकारण शिवीगाळ करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पितांबर याने याबाबत विचारणा करीत अनिकेत कांबळे याला तेथून जाण्यास सांगितले. यानंतर अनिकेत कांबळे याचा भाऊ सराईत गुन्हेगार आतिश उर्फ बाबू राजेंद्र कांबळे, विशाल वाडेकर, रामा दादा मंडलिक, ओंकार कांबळे यांनी घटनास्थळी येवून कोणतीही विचारपूस न करता शिवीगाळ व दमदाटी करीत पितांबर कुडाळकर याला बेदम मारहाण केली.
यावेळी अनिकेत कांबळे याने आता तुला खल्लासच करतो म्हणत पितांबर याच्या छातीवर, हातावर धारदार शस्ञाने वार केले. यात पितांबर गंभीर जखमी झाला. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या अंकुश कुडाळकर, अमित कुडाळकर, वैष्णवी मोतीराम कुडाळकर, शालन बबन कुडाळकर, यशोदा लाला कुडाळकर व नंदा जावळीकर यांनाही संशयितांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली.
घटनेनंतर पसार झालेल्या संशयितांना शिरवळ पोलिसांनी एका तासात जेरबंद केले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पितांबर कुडाळकर याने शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे अधिक तपास करीत आहे.
शिरवळच्या कोल्हाटी वस्तीत तरुणावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी
by Team Satara Today | published on : 02 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा