‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’वर लोणंद गावच्या सालपा स्थानकाजवळ दरोडा, तीन महिला प्रवाशांचे दोन लाखांचे दागिने लंपास

by Team Satara Today | published on : 02 November 2026


सातारा : मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’मध्ये रविवारी मध्यरात्री ८ ते १० जणांच्या टोळीने धुडगूस घालत लूटमार करत दरोडा टाकला. सातारा जिल्ह्यातील लोणंद गावच्या सालपा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबविली. त्यानंतर आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश करून झोपेत असलेल्या तीन महिला प्रवाशांचे सोन्याचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. सुनीता गोरक्षनाथ तुपे (४०, रा. कांजूरमार्ग ईस्ट मुंबई) यांनी मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहप्रवासी सुरेखा बाबासाहेब खाडे (४०, रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) यांचेही दागिने चोरीस गेलेे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी एक्स्प्रेस रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सालपा स्थानकाजवळ आली. यावेळी चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून आणत रेल्वे थांबवली. रेल्वे अचानक थांबल्याने प्रवाशांना सुरुवातीला अंदाज आला नाही. याचा फायदा घेत पाच ते सहाजणांच्या टोळीने आरक्षित डब्यांना लक्ष्य केले. रेल्वेतील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी डब्यांमध्ये प्रवेश केला. कोल्हापूर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या तीन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.
चोरट्यांनी रेल्वेतून उडी मारल्यानंतर काही प्रवाशांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी पळून जाताना एक्स्प्रेसच्या एस २, एस ३ आणि एस ५ या डब्यांवर दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मध्यरात्रीचा अंधार, रेल्वे थांबलेली असताना झालेली लूटमार आणि त्यानंतरच्या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
टोळीतील काही सदस्य सिग्नल यंत्रणेजवळ थांबले होते; तर काहीजण रेल्वेतूनच प्रवास करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच रेल्वे थांबविण्यासाठी सिग्नल यंत्रणेत नेमका कसा बिघाड करण्यात आला, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज रेल्वे पोलिसांना कळविले. त्यानंतर रेल्वे पोलिसांचे पथक चोरट्यांचा माग काढण्यासाठी सातारा जिल्ह्यात रवाना झाले. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितांचा शोध सुरू आहे.
रेल्‍वेमध्ये चोरट्यांनी थेट समोर जाऊन चोर्‍या केलेल्‍या नाहीत. खिडकीचा आधार घेऊन महिलांचा सोन्‍याचा ऐवज लंपास केला आहे. यामागे टोळी असून रेल्‍वे पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांचे आवाहन
पुढील बातमी
दिवाळीच्या खरेदीसाठी साताऱ्यातील दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी; विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या

संबंधित बातम्या