सातारा : खरीप हंगाम २०२६ साठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू ठेवण्यास शासनाने मान्यता दिली असून, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेमध्ये गहू बागायत, रब्बी ज्वारी बागायत, रब्बी ज्वारी जिरायत, हरभरा, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा या सहा प्रमुख पिकांचा समावेश आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पिकांनुसार अंतिम मुदती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर २०२६, गहू, हरभरा व कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२६, तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२७ ही अंतिम मुदत आहे. सर्व पात्र शेतकरी, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी तसेच कुळांनाही या योजनेत सहभागी होता येईल. सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे.
योजनेत सहभागासाठी ७/१२ उतारा, खाते उतारा, ई-पीक पाहणी नोंद असलेला ७/१२ उतारा, फार्मर आयडी क्रमांक, बँक पासबुक आणि फोटो ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी आपले अर्ज वैयक्तिकरित्या विमा कंपनीकडे सादर करून किंवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे थेट या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेसाठी आवश्यक असलेला विहित नमुन्यातील अर्ज बँकांकडे आणि विमा कंपनीकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पात्र शेतकऱ्यांनी आपले खाते असलेल्या राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत, पोस्ट कार्यालयात, विमा कंपनीच्या एजंटकडे, सार्वजनिक सुविधा केंद्रावर अथवा संकेतस्थळाच्या माध्यमातून विहित मुदतीपूर्वी विमा हप्ता जमा करावा. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी ग्राम पातळीवरील सहायक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 02 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा