सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीला अखेर वाहतूक पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे लगाम बसला आहे. बसस्थानकाकडे येणार्या आणि तेथून बाहेर पडणार्या रस्त्यांवरच फेरीवाले, पथारीवाले आणि व्यावसायिकांनी आपले बस्तान बसवल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सातारा वाहतूक शाखेने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवून परिसरातील रस्ते मोकळे केले.
वाहतूक शाखेचे प्रमुख राजेश माने यांनी अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि थेट मैदानात उतरून या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांनी केवळ औपचारिक कारवाई न करता स्वतः पथकासह बसस्थानक परिसराची सूक्ष्म पाहणी केली. अत्यंत खंबीर आणि पारदर्शक भूमिका घेत त्यांनी अनधिकृत व्यवसाय, दुकानांसमोरील बेकायदेशीर विस्तार आणि रस्त्यांवर लावलेल्या जाहिरात फलकांवर त्वरित कठोर कारवाई केली. त्यांच्या या धडक आणि धाडसी निर्णयामुळे वर्षानुवर्षे रस्ता व्यापून बसलेल्या हॉकर्स आणि पथारीवाल्यांना हटवून रस्त्यावरील सर्व व्यावसायिक अडथळे व साहित्य जप्त करण्यात आले.
बसस्थानक परिसर हा सातारा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. ग्रामीण भागातून येणारे प्रवासी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची येथे दिवसभर गर्दी असते. मात्र, रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहनांना मार्ग काढणे अवघड होत होते. अनेकदा वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीचा वेग मंदावत होता आणि पादचार्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत होते. निरीक्षक राजेश माने यांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि पोलीस यंत्रणेला दिलेल्या स्पष्ट सूचनांमुळे ही कारवाई अत्यंत वेगाने पार पडली.
अतिक्रमणांविरोधात कोणतीही गय करणार नाही
या धडक कारवाईमुळे परिसरातील वाहतुकीने सुटकेचा निःश्वास सोडला असून प्रवाशांनी व स्थानिक नागरिकांनी पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या कार्यशैलीचे आणि या धाडसी पाऊलाचे विशेष कौतुक केले आहे. मोहीम राबवून शांत न बसता, हटविण्यात आलेली अतिक्रमणे पुन्हा उभी राहू नयेत यासाठी त्यांनी परिसरात नियमित गस्त आणि कडक देखरेखीची व्यवस्थाही निश्चित केली आहे. बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था कायमस्वरूपी शिस्तबद्ध ठेवण्यासाठी यापुढेही अतिक्रमणांविरोधात कोणतीही गय न करता हीच कठोर भूमिका कायम ठेवली जाईल, असा विश्वास राजेश माने यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बसस्थानक परिसरातील हॉकर्स, पथारीवाले,अनधिकृत फलक हटविले; वाहतूक शाखा प्रमुख राजेश माने यांनी उगारला शिस्तीचा बडगा, प्रवाशांना मोकळा रस्ता मिळणार
by Team Satara Today | published on : 02 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा