जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई मेल; सातार्‍यात खळबळ; तपासणीअंती खोटी धमकी असल्याचे आले समोर

by Team Satara Today | published on : 02 November 2026


सातारा : जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई मेल आल्यानंतर शहर हादरुन गेले. पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोधक पथकासह तब्बल 4 तास संपूर्ण न्यायालयाची तपासणी केली. मात्र बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू सापडली नसल्याने खोटी धमकी दिल्याचे समोर आले आहे.
सोमवारी सकाळी नियमित वेळेत सातारा जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरु झाले होते. न्यायाधीश, वकील मंडळी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पक्षकार न्यायालयात आले होते. यामुळे न्यायालयात वर्दळ होती. अशातच सकाळ 11.30 वाजण्याच्या सुमारास पंजाबी भाषेशी साधर्म्य असलेल्या भाषेत न्यायालय प्रशासनाला एक ई मेल आला. त्यामध्ये ‘सातारा न्यायालय बॉम्बने उडवून देणार,’ अशा आशयाचा मजकूर होता. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने तात्काळ सातारा पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, सातारा शहर पोलिसांसह इतर सर्वच विभागातील पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयातील सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी परिसर लॉक डॉउन पध्दतीने मोकळा केला. बॉम्ब शोधक व श्वान पथकाने न्यायालयाचा प्रत्येक आवार पिंजून काढण्यास सुरुवात केली. न्यायालय बाहेर असणारी सर्व वाहने देखील तपासणी करण्यात आली.
पोलिसांनी पहिल्या दीड तासामध्ये सर्व परिसरात सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर प्राथमिक कुठे काहीही बॉम्ब सदृश वस्तू आढळली नसल्याचे समोर आले. मात्र आणखी दोनवेळा सर्व परिसर पिंजून काढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार दुपारी साडेचार पर्यंत पोलिसांची शोध मोहिम सुरु होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फटाक्यांऐवजी सर्जनशील ज्ञान दीपावली साजरी करा; साहित्यवेल प्रकाशनचे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचे आवाहन
पुढील बातमी
बसस्थानक परिसरातील हॉकर्स, पथारीवाले,अनधिकृत फलक हटविले; वाहतूक शाखा प्रमुख राजेश माने यांनी उगारला शिस्तीचा बडगा, प्रवाशांना मोकळा रस्ता मिळणार

संबंधित बातम्या