सातारा : कण्हेर परिसरातील आय.बी. क्रिकेट मैदानावर प्रेमसंबंधांच्या जुन्या वादातून एका तरुणावर बंदुकीतून थेट गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या थरारक हल्ल्यात विजय ज्ञानेश्वर वाघमळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
कण्हेर गावाशेजारील वेळे-कामठी रस्त्यालगत असलेल्या आय.बी. क्रिकेट मैदानावर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कण्हेर परिसरासह सातारा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जखमीचा भाऊ विकास ज्ञानेश्वर वाघमळे (वय ३५, रा. गणेशनगर, कण्हेर, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी संशयित आरोपी नितीन बबन साबळे (रा. गणेशनगर, कण्हेर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जखमी विजय वाघमळे याचे एका तरुणीवर प्रेम होते. मात्र, या प्रेमसंबंधांना संशयित नितीन साबळे याचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होता. संबंधित तरुणीशी असलेले संबंध पूर्णपणे तोडून टाकावेत यासाठी नितीनकडून विजयवर सातत्याने दबाव आणला जात होता. हा वाद कायमचा मिटविण्याच्या बहाण्याने नितीनने विजयला वेळे-कामठी रस्त्यावरील निर्जन असलेल्या आय.बी. क्रिकेट मैदानावर बोलवून घेतले.
मैदानावर दोघे समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा याच विषयावरून जोरदार बाचाबाची सुरू झाली. नितीनने संबंधित तरुणीशी संबंध त्वरित थांबव आणि तिचे गावात लग्न होऊ देणार नाही, असा सज्जड दम विजयला भरला. त्यावर विजयने आपण तिच्यावरच प्रेम करत असून तिच्याशीच लग्न करणार असल्याचा ठाम पवित्रा घेतला. विजयच्या या भूमिकेमुळे नितीनचा संताप अनावर झाला. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत होत असतानाच, नितीनने पाठीमागे शर्टमध्ये लपवून आणलेले अग्निशस्त्र (बंदूक) बाहेर काढले. तुला आता जिवंत सोडतच नाही अशी धमकी देत त्याने अत्यंत जवळून विजयच्या दिशेने थेट गोळी झाडली. गोळी लागताच विजय रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला, तर गोळीबाराच्या आवाजाने आणि रक्ताळलेल्या अवस्थेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली.
घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या विजयला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपासाची चक्रे फिरवत संशयित नितीन साबळे याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यासह अटकेची पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
कण्हेर परिसरातील क्रिकेट मैदानावर थरार; प्रेमसंबंधाच्या वादातून गोळीबार, तरुण गंभीर जखमी
लग्नाचा तगादा लावून गावात लग्न न करण्याचा इशारा; संशयित पोलिसांच्या ताब्यात
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा