सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चितळी या छोट्याशा गावचे सुपुत्र आणि केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अर्जुन वसंत पवार यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. तपास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि संवेदनशील प्रकरणांचा यशस्वी तपास केल्याबद्दल त्यांना हा सन्मान जाहीर झाला असून, त्यांच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अर्जुन पवार यांचे मूळ गाव चितळी (ता. खटाव, जि. सातारा) आहे. त्यांनी १९९३ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सीबीआयमध्ये प्रवेश केला. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला. गुन्ह्यांचा सखोल अभ्यास, तपासातील बारकावे आणि पुराव्यांच्या आधारे आरोपींना न्यायालयात दोषी ठरविण्यात त्यांच्या तपास कौशल्याचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत २०१७ मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप आणि आरोपींकडून वापरल्या जाणाऱ्या नवनवीन पद्धती लक्षात घेऊन त्यांनी तपास कौशल्य अधिक विकसित करण्यावर सातत्याने भर दिला. अलीकडील काळात त्यांनी तपासलेल्या हायप्रोफाईल प्रकरणांतील कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांची दक्षता पदकासाठी निवड केली आहे.
या दुहेरी राष्ट्रीय सन्मानामुळे अर्जुन पवार यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. त्यांच्या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. भरत जाधव यांनीही पवार यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
चितळीसारख्या ग्रामीण भागातून प्रवास सुरू करून देशाच्या महत्त्वाच्या तपास यंत्रणेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या अर्जुन पवार यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
साताऱ्याच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान; CBIचे डीवायएसपी अर्जुन पवार यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
चितळीच्या मातीतून देशाच्या तपास यंत्रणेपर्यंत मजल; यापूर्वी राष्ट्रपती पोलीस पदकानेही गौरव
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा