राजकारणात माझे राहिलेले अपूर्ण स्वप्न माझ्या लेकीने पूर्ण केले : माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केले मन मोकळे

by Team Satara Today | published on : 31 October 2026


कराड : पुणे पदवीधर मतदारसंघातील दिमाखदार विजयानंतर नवनिर्वाचित आमदार सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांनी कराड येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी जाऊन दर्शन घेतले. या भावनिक क्षणी त्यांचे वडील, ज्येष्ठ नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी आपले मन मोकळे करत, राजकारणात माझे राहिलेले अपूर्ण स्वप्न आज माझ्या लेकीने पूर्ण केले, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त करताना प्रभाकर देशमुख म्हणाले की, प्रशासकीय सेवेनंतर मी सक्रिय समाजकारणात उतरलो आणि सातत्याने जनतेच्या प्रश्नांशी एकरूप राहिलो. लोकांशी जोडलेली ही नाळ आज पदवीधर मतदारांनी मतांच्या विश्वासाने दाखवून दिली आहे. ही निवडणूक केवळ राजकीय लढत नव्हती, तर सुशिक्षित पदवीधर आणि तरुणांनी ती स्वतःच्या हातात घेतली होती. त्यामुळे हा ऐतिहासिक विजय मी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि तरुणाईला समर्पित करतो.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना अवघ्या ३ हजार ४३ मतांनी झालेला पराभव प्रभाकर देशमुख यांच्या मनात एक सल सोडून गेला होता. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधातील त्या अत्यंत चुरशीच्या तिरंगी लढतीत जनसमर्थन असूनही विजयाने दिलेली ती निसटती हुलकावणी कायम स्मरणात राहिली होती. मात्र, पुणे पदवीधरसारख्या मोठ्या मतदारसंघात कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयाने ती जुनी सल पुसून काढली. प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात वडिलांचे हुकलेले विधिमंडळाचे दार लेकीने स्वतःच्या कर्तृत्वाने उघडल्याचे समाधान प्रभाकर देशमुख यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होते. यशवंतरावांच्या समाधीसमोर नतमस्तक होताना एका बापाने लेकीच्या यशाबद्दल व्यक्त केलेले हे उद्गार उपस्थितांनाही भावूक करून गेले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुरूकुल स्कूलच्या शौर्य बनकरची बॉक्सिंग स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात निवड; सलग तिसर्‍या वर्षी पटकावले राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
पुढील बातमी
महाबळेश्वरमधील भांडणाचा सातार्‍यात वचपा; बुधवार पेठेत घरात घुसून तरुणावर हल्ला

संबंधित बातम्या