गुरूकुल स्कूलच्या शौर्य बनकरची बॉक्सिंग स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात निवड; सलग तिसर्‍या वर्षी पटकावले राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

by Team Satara Today | published on : 31 October 2026


सातारा : सातारा येथील शाहूनगरस्थित गुरुकुल स्कूलचा विद्यार्थी शौर्य योगेश बनकर याने परभणी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 17 वर्षांखालील (52 ते 54 वजनगट) सब-ज्युनिअर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या चमकदार कामगिरीची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे, चि. शौर्य याने सलग तिसर्‍या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्याच्या या यशाची दखल घेत स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मणीपूर येथे आयोजित करण्यात येणार्‍या 70 व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी 17 वर्षांखालील मुलूंच्या महाराष्ट्र संघात त्याची अधिकृत निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याच्या या स्पृहणीय यशाबद्दल गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते चि. शौर्य याचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास प्रशासकीय अधिकारी शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सोनाली तांबोळी आणि जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना राजेंद्र चोरगे म्हणाले की, विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये गुरुकुल स्कूलचे विद्यार्थी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करत आहेत. चि. शौर्य बनकर हा सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर जिल्ह्याचे नाव उंचावेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मणीपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेतही त्याला यश मिळेल अशी खात्री वर्तवत त्यांनी त्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
चि. शौर्य बनकर यांच्या या यशामध्ये आणि राष्ट्रीय स्पर्धेतील निवडीबद्दल आनंद गुरव, अर्जुन चोरगे, ऍड. ऐश्वर्या चोरगे, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल, हरिदास साळुंखे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समितीने त्याचे अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कामगारांच्या प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध; महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा सातारा विभागाचा दौरा उत्साहात
पुढील बातमी
राजकारणात माझे राहिलेले अपूर्ण स्वप्न माझ्या लेकीने पूर्ण केले : माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केले मन मोकळे

संबंधित बातम्या