सातारा : नशामुक्त भारत अभियानांतर्गत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आज सकाळी जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
सकाळी ७ वाजता पोलीस परेड ग्राउंड, सातारा येथे रॅलीच्या प्रारंभी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांनी उपस्थित अधिकारी, अंमलदार व नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच व्यसनांचे दुष्परिणाम, तरुण पिढीवरील व्यसनाधीनतेचे संकट आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
या रॅलीमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलातील १० पोलीस अधिकारी, १४० पोलीस अंमलदार तसेच सातारा शहरातील ४० सायकलप्रेमींनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये पोलीस प्रशासनासोबत महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती नूतन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस परेड ग्राउंड येथून सुरू झालेली ही रॅली पोवई नाका, छत्रपती शाहू महाराज चौक, मोती चौक, राजवाडा, मोती चौक, ५०१ पाटी मार्गे पुन्हा पोवई नाका व पोलीस परेड ग्राउंड येथे येऊन संपन्न झाली. रॅलीदरम्यान सहभागींकडून व्यसनमुक्तीविषयक संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
"स्वतः व्यसनांपासून दूर राहा, इतरांनाही व्यसनमुक्तीसाठी प्रेरित करा" असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. व्यसनमुक्त कुटुंब, व्यसनमुक्त समाज आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे तसेच "स्वतः व्यसनमुक्त राहूया, इतरांनाही व्यसनमुक्त करूया आणि नशामुक्त भारताचे स्वप्न साकार करूया!"
या उपक्रमाच्या माध्यमातून निरोगी, सुरक्षित व व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प अधिक दृढ करण्याचा संदेश सातारा जिल्हा पोलीस दलाने दिला.
नशामुक्त भारत अभियानांतर्गत सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे जनजागृती सायकल रॅली उत्साहात
by Team Satara Today | published on : 31 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा