सातारा: खंडणी मागणे, नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे अशा विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पाचगणीतील अनमोल अशोक कांबळे (वय ३०, रा. सिद्धार्थनगर, पाचगणी) याच्यावर अखेर दोन वर्षांच्या तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश वाईच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे याच्याविरुद्ध २०२० ते २०२६ या कालावधीत पाचगणी पोलीस ठाण्यात खंडणी, धमकावणे, मारहाण, शासकीय कामात अडथळा आणणे आणि मानहानी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. वारंवार कायदेशीर कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
काही स्थानिक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या बांधकामाबाबत बातमी प्रसिद्ध करण्याची तसेच ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. संबंधित नागरिकांनी भीतीपोटी तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, त्यांनी पोलिसांसमोर गोपनीयतेच्या अटीवर जबाब नोंदवून आपली व्यथा मांडली.
या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी चौकशी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन वर्षांच्या हद्दपारीचा आदेश जारी केला.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व पाचगणी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पाचगणीतील अनमोल कांबळे दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार; वाईच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
by Team Satara Today | published on : 31 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा