शिवानी कळसकर यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी; उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजेंच्या विश्‍वासाला विकासकामांतून उतराई होण्याचा निर्धार

by Team Satara Today | published on : 30 October 2026


सातारा : सातारा नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या रिक्त जागेवर अखेर शिवानी कळसकर यांची नियुक्ती झाली आहे. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडीचा मार्ग सुकर झाला होता. शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या विशेष सभेत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे सातारा पालिकेच्या सभागृहात आता नव्या चेहर्‍याला काम करण्याची संधी मिळाली आहे.
स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर या जागेसाठी निवडप्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा प्राधिकृत अधिकारी आणि भाजप गटनेत्यांच्या शिफारशीसह आवश्यक कागदपत्रांची छाननी करण्यात आली. पात्रतेचे निकष पूर्ण करणारा शिवानी कळसकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या विशेष सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
निवडीची घोषणा होताच सभागृहातील उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ऍड. दत्ता बनकर, भाजप गटनेते अविनाश कदम, विविध समित्यांचे सभापती तसेच माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
विकासकामांच्या पाठपुराव्याला प्राधान्य
या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवानी कळसकर यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सातारा शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि नागरिकांच्या कामांसाठी सक्रिय राहणे, हेच आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडीनंतर शिवानी कळसकर आणि त्यांचे पती प्रीतम कळसकर यांनी जलमंदिर येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे यांनी त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुपोषणमुक्त सातार्‍यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार; कुपोषित बालकांसाठी 15 लाखांची तरतूद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
पुढील बातमी
पायड बांधत असताना पडल्याने कामगाराचा मृत्यू; साताऱ्यातील धुमाळआळीतील घटना

संबंधित बातम्या