पोटच्या मुलाचा गळा आवळून खून करणाऱ्या पित्याला जन्मठेप; हिवरेत घडलेल्या घटनेचा निकाल

by Team Satara Today | published on : 30 October 2026


सातारा : स्वत:च्या पोटच्या 12 वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या पित्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  विजय आनंदराव खताळ (वय 35, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप, तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी (डीजे-2) यांनी शुक्रवारी (दि. 30) हा निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी विजय खताळ याला कॅन्सर झाला असून आपण आता जगणार नाही, अशी त्याची समजूत झाली होती. आपल्या मृत्यूनंतर मुलगा विक्रम ऊर्फ प्रणव विजय खताळ (वय 12) याचे हाल होतील. तो गरीब स्वभावाचा असल्याने त्याला सांभाळणारे कोणी नसेल, या विचारातून त्याने मुलाला आपल्याआधीच मृत्यूच्या दारात ढकलण्याचा निर्णय घेतला.
याच विचारातून 23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या दरम्यान त्याने गोठ्यातील गाईला बांधण्यासाठी वापरण्यात येणार्‍या दोरीने मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:च्याच उसाच्या शेतात मुलाचा मृतदेह पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. भोसले यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता एम. कुलकर्णी आणि तत्कालीन जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती लकडे यांनी बाजू मांडली.
खटल्यादरम्यान एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांच्या जबान्या तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचे दाखले न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
भारतीय दंड विधान कलमाअंतर्गत आरोपीला जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी आणि 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मेळावणे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रायगड जिल्ह्यातील तीन आरोपी कारसह तासवडे टोल नाक्यावर ताब्यात; तळबीड पोलिसांची तत्पर कारवाई
पुढील बातमी
कुपोषणमुक्त सातार्‍यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार; कुपोषित बालकांसाठी 15 लाखांची तरतूद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय

संबंधित बातम्या