मुंबई : शिवसेना शिंदेगटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले आहेत. या वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड यांच्या निलंबनाचा आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात शिवसेना शिंदेसेने मदतीला धावून जाते. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिंदेसेनेने व्यापक मदत मोहीम सुरू केली आहे. शेतकरी कुटुंबांतील लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशिन्सचे वाटप केले जात आहे. शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकली दिल्या जात आहेत. दसरा मेळाव्यात १०० ट्रक अन्नधान्य दुष्काळग्रस्त भागात शिंदेसेनेकडून पाठवले आहेत. गुरुवारी आणखी २४ ट्रक धान्य पाठवण्यात आले.
शिंदेंची शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस काम करत असताना संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेनेची प्रतिमा नाहक मलीन होत असल्याची पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे समजते.
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी नुकताच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मैतीला कुणी जाऊ नये, असे विधान त्यांनी केले होते. ते म्हणाले होते की, 'शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार, खासदार यांना चिठ्ठी लिहावी. आम्ही सर्वजण मिळून त्याची मदत करू. पण शेतकरी कुठल्याही विचार न करता आत्महत्या करतात. त्यामुळे त्यांच्या मौतीला कुणी जाऊ नये.'
आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार ; उपमुख्यमंत्र्यांकडून निलंबनाचा आदेश, राजकीय वर्तुळात खळबळ
by Team Satara Today | published on : 30 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा