कराडमध्ये मृत कासवाजवळ जमलेल्या 35 पक्ष्यांचा काही मिनिटांतच मृत्यू झाल्याने खळबळ; विषबाधा की आणखी काही, वनविभाग सतर्क

by Team Satara Today | published on : 29 October 2026


सातारा : कराड येथील कोयना नदीपात्रात ३५ हून अधिक पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नदीकाठच्या परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या कासवाजवळ जमलेल्या ‘पिवळा धोबी’  प्रजातीच्या पक्ष्यांचा काही मिनिटांतच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वनविभाग सतर्क झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कोयना नदीकाठच्या परिसरात ‘पिवळा धोबी’ प्रजातीचे पक्षी वावरत होते. याच परिसरात एक कासव मृतावस्थेत आढळले. या कासवाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात अळ्या झाल्या होत्या. त्यानंतर या मृत कासवाजवळ पक्ष्यांचा थवा जमला होता.
मात्र, काही मिनिटांतच हे पक्षी अचानक जमिनीवर कोसळू लागले. कोणतीही स्पष्ट पूर्वलक्षणे दिसत नसताना ३५ हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपासणी
या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तपासणी सुरू केली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांनीही घटनास्थळी तपासणी केली आहे. पक्ष्यांचा मृत्यू नदीतील पाण्यातील संभाव्य दूषित घटकांमुळे झाला, निसर्गातील बदलामुळे झाला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतकऱ्यांबाबत आ. गायकवाड यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ कराडमध्ये आक्रमक आंदोलन
पुढील बातमी
कोयना-कृष्णा नदीतील पाण्याची पातळी घटली; कराड शहराला आता दिवसातून एकदाच पाणीपुरवठा

संबंधित बातम्या