कराड : ऊसाला प्रतिटन साडेपाच हजार रुपये दर मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी ओगलेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. साखरेचा दर प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करून शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन साडेपाच हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात लक्ष वेधले गेले.
ऊस उत्पादनासाठी करावा लागणारा खर्च, शेतीसाठी लागणारी वाढती मजुरी, खते, औषधे आणि इतर निविष्ठांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर उसाला योग्य दर मिळणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी मांडली. साखर आणि इथेनॉलच्या दरांची निश्चिती करून त्याचा योग्य मोबदला ऊस उत्पादकांना मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले. त्यानंतर सुमारे अर्धा तास रस्त्यावर बसून त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन साडेपाच हजार रुपये दर मिळावा, या मागणीवर आंदोलक ठाम होते. या आंदोलनात सतीश डांगे, अमित डुबल, श्रीकांत भोसले, पवन भोसले, योगेश डुबल यांच्यासह ओगलेवाडी व परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकरी संघटना एकवटल्या..
ऊस दर आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत असून ऊस दरासाठी शेतकरी संघटना आणि शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत. शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, यशवंत शेतकरी संघटना यांनी तांबवे फाटा येथे रस्तारोको आंदोलन केले. स्वाभिमानी संघटनेने शिरवडे, बेलवड, येथील ऊसाच्या फडात जाऊन ऊसतोड बंद पाडली.
ओगलेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांचे ऊसाच्या दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन; आंदोलनस्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात
by Team Satara Today | published on : 29 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा