महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, उद्योजकता आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महात्मा फुले यांचे समाजपरिवर्तनाचे विचार, सत्यशोधक चळवळीचे कार्य आणि स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी केलेले योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
सर्वसामान्यांना दिलासा देणारा महात्मा फुले समता शिधा
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील एपीएल (केशरी) प्रवर्गातील एकूण १ कोटी ७५ लाखांहून अधिक कुटुंबांना महात्मा फुले समता शिधा योजनेतून रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेलाचा संच केवळ १०० रुपयांत देण्याचे नियोजन आहे. जुलै २०२६ ते जून २०२७ या कालावधीत चार टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी १,८३८.४० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समतेवर भर
अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत, निराधार व परित्यक्ता महिलांना लघुउद्योगासाठी अनुदान, विद्यार्थ्यांसाठी निबंध-वक्तृत्व स्पर्धा आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे उर्दू भाषांतर असे उपक्रम प्रस्तावित आहेत. सामाजिक न्याय विभागामार्फत त्यांच्या जीवनकार्यावर माहितीपट, समग्र वाङ्मयाची सवलतीच्या दरात विक्री आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.
आदिवासी विकास विभागाच्या ४९९ शासकीय आश्रमशाळा आणि ४९४ वसतिगृहांमध्ये व्याख्याने, प्रभातफेरी, चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धा आणि पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच ग्रंथालय संचालनालयामार्फत व्याख्याने, ग्रंथप्रदर्शने, सामुदायिक वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे फुले दांपत्याचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात येतील.
शेतकरी, युवक आणि पर्यावरणासाठी उपक्रम
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तांत्रिक कौशल्य प्रदर्शनी आणि सत्यशोधक उद्योजकता कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजन आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील युवक व महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यावर भर राहणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत शाश्वत शेती, जलसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, पथनाट्ये आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
स्मारके, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महसूल लोकअदालत
सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच कटगुण आणि पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे महात्मा जोतीराव फुले यांची स्मारके विकसित करण्याचे नियोजन आहे. राज्यातील सहा प्रशासकीय विभागांमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यप्रयोग, ‘समग्र महात्मा फुले’ आणि शाहू-फुले-आंबेडकरी जलसा यांसारखे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
महसूल विभागामार्फत १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रलंबित महसुली दावे आणि अपिले निकाली काढण्यावर भर देण्यात येईल. याशिवाय महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडीतील बालकांना महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. खडकवासला धरण जलाशयास त्यांचे नाव देण्याचाही प्रस्ताव आहे.
महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारे हे उपक्रम केवळ स्मरणापुरते मर्यादित नसून, समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि स्वावलंबनाचे विचार समाजात रुजविण्याची संधी आहेत. विविध विभागांच्या समन्वयातून या विचारांचा प्रसार करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत महात्मा फुले यांच्या कार्याचा वारसा पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन
by Team Satara Today | published on : 29 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा