लोणंद : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात चोरी झाल्याची घटना मंगळवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी मंदिरातील चांदीचा मुखवटा, त्रिशूळ, चांदीच्या पादुका आणि दानपेटी असा १ लाख १५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मंदिराचे पुजारी रविकिरण शिवाजी शिंदे (वय २६, रा. पाडेगाव, ता. फलटण) यांनी लोणंद पोलिस ठाणे, लोणंद फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास दत्त मंदिराचे पुजारी शशिकांत गजानन खरात यांनी शिंदे यांना फोन करून भैरवनाथ मंदिरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता चांदीचा मुखवटा, त्रिशूळ, पादुका आणि दानपेटी गायब असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी (दि. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास मंदिरातील साहित्य जागेवर नसल्याचे शिंदे यांच्या वडिलांनी सांगितले होते. त्यामुळे सोमवारी रात्री साडेनऊ ते मंगळवारी पहाटे पाच या कालावधीत चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा फेट्याच्या नक्षीचा व लाल खडा असलेला चांदीचा मुखवटा, नक्षीकाम केलेला सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा त्रिशूळ, ४० हजार रुपये किमतीच्या सुमारे ५०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका आणि १०० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची लाकडी दानपेटी यांचा समावेश आहे.
मुखवटा, त्रिशूळ आणि पादुका सुमारे १५ वर्षांपूर्वी मंदिराला दान करण्यात आल्या होत्या. ग्रामदैवताच्या मंदिरातच चोरी झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाणे, लोणंद अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे.
पाडेगावला भैरवनाथ मंदिरातून चांदीचा मुखवटा, त्रिशूळ, पादुका लंपास; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
by Team Satara Today | published on : 28 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा